सरसकट कर्जमाफीच हवी; राष्ट्रवादीचा सरकारला अल्टिमेटम; देशव्यापी आंदोलन छेडणार – पवार

0

नाशिक । राज्यात आणि देशात शेतकर्‍यांवर मोठी संकटे आली असून शेतीमालाच्या किमतीची अवस्था बिकट झाली आहे. मात्र हे सरकार फक्त ग्राहकांच्या हिताचा विचार करते, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर हे सरकार गंभीर नाही. त्यामुळे आता सरकारला शेतकर्‍यांची सामूहिक ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे.

आज बळीराजा गप्प आहे, पण उद्या जर शेतकरी रस्त्यावर उतरला तर कुणाच्या बापाला घाबरणार नाही, असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. सरकारने पिककर्जासह शेतीसंसाधनावरील कर्जही माफ करावे याकरिता सरकारला महिनाभराचा अवधी दिला असून सरसकट कर्जमाफी न दिल्यास रस्त्यावर उतरून शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन छेडण्याचा इशाराही पवार यांनी दिला.

राष्ट्रवादी किसान मंचच्या वतीने नाशिक येथील नंदनवन लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियानाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कर्जमाफीवरून त्यांनी सरकारला चांगलेच फटकारले. भाजपने जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफीची घोषणा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली. नंतर त्यांनी ‘संपूर्ण’ शब्द काढून टाकला. आधी दीड लाख भरा, मग कर्जमाफी मिळेल, असा आदेश त्यांनी काढला. 2016 पर्यंतच्या कर्जदार शेतकर्‍यांना निकषानुसार कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र 2017 संपत आला तरी, अद्याप शेतकर्‍यांना काही मिळालेले नाही. गणेशोत्सवाच्या आधी देवू म्हणाले, नंतर दसर्‍याच्या आधी देऊ म्हणाले, आता म्हणतात, दिवाळीपूर्वी देवू.

त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजे लबाडघरचे जेवण आहे, जेवणाशिवाय खरे नसते, अशा शब्ंदात त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. आज देशात आणि राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची किंमत सगळ्यांनाच मोजावी लागत आहे. खरे तर शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकर्‍यांना ही किंमत जास्त मोजावी लागत आहे.

शेतमालाला कवडीमोल किमती मिळत आहे. मी कृषिमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले तेव्हा भाजपचे खासदार गळ्यात कांद्याच्या माळा घालून सभागृहात आले आणि मला याचे उत्तर मागितले. परंतु मी शेतकर्‍यांचे नुकसान होऊ दिले नाही. परंतु हे सरकार केवळ ग्राहकांच्या हिताचा विचार करते. त्यामुळे सरकारने उत्पादकांचाही विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिला. शेतमालाच्या किमतीशी खेळ करणे सरकारला परवडणारे नाही. शेतकरी जर उद्ध्वस्त झाला तर, देश उद्ध्वस्त होईल. परंतु या सरकारला शेतकर्‍यांशी काहीएक देणेघेणे दिसतं नाही.

त्यामुळे आता या राज्यकर्त्यांना शेतकर्‍यांची सामूहिक ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. शेतकर्‍यांना केवळ कर्जमाफी नको तर शेतीसंसाधनांवरील कर्जही माफ करावे, याकरिता मी स्वतः शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने रस्त्यावर उतरणार असून लवकरच देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा पवार यांनी यावेळी दिला. याकरिता एक कृती कार्यक्रम तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी किसान मंचला दिल्या.

महिनाभरात कर्जमाफी न दिल्यास 5 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथे होणार्‍या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वनाधिपती विनायकदादा पाटील, किसान मंचचे शंकर अण्णा धोंडगे, दत्ता पवार, हेमराज कोर, किशोर माथनकर, आ. पंकज भुजबळ, आ. दीपिका चव्हाण, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, विष्णुपंत म्हैसधुणे आदी मान्यवर उपस्थित होते.

सरकारकडून जनतेची लूट : देशभरात महागाईचा उच्चांक गाठला असून या मुद्यावरही पवारांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. देशत पेट्रोल, डिझेल, रॉकेलच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. जगात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने कच्चे तेल निर्मिती करणारे आखाती देशसुद्धा संकटात सापडले असताना भारतात मात्र इंधनाच्या किमती वाढवून सरकार जनतेची लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केला. याचा सर्वसामान्यांना त्रास होत असून दरवाढ मागे घेण्याची गरज पवारांनी व्यक्त केली आहे.

नोटबंदीने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त : पंतप्रधान मोदींनी घाईघाईने नोंटबंदीची घोषणा केली, म्हणे काळा पैसा बाहेर काढू. 86 हजार कोटी रुपयांच्या नोटांची किंमत एका क्षणात शून्य केली काय निष्पन्न झाले? कुठे गेला काळा पैसा? या नोटबंदीचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागला. सुरुवातीला सर्वांनी या निर्णयाचे कौतुक केले. मात्र, नंतर जनता वैतागली. सरकारशी लागेबांधे असणार्‍यांनी नोटा बदलून घेतल्या, असा आरोप करत नोटबंदीने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

*