Type to search

maharashtra जळगाव

सरकार आम्ही की तुम्ही? जिल्हाधिकार्‍यांना सुनावले!

Share
जळगाव । रस्त्याचा निधी परवानगी न घेताच नाट्यगृहासाठी परस्पर वळविल्याप्रकरणी ‘तुम्ही जिल्ह्याचे प्रमुख असले तरी सरकार आम्ही आहोत’ निधी वळविण्यासाठी कुणाची परवानगी घेतली?, सरकार तुम्ही की आम्ही? रस्ते महत्वाचे की नाट्यगृह? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना चांगलेच खडे बोल सुनावले.

पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी आज अजिंठा विश्रामगृह येथे जिल्ह्यातील वार्षिक योजनांसह विविध विभागांचा आढावा घेतला. बैठकीदरम्यान जिल्हा परीषदेंतर्गत असलेल्या रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन मंडळातुन 5 कोटी 50 लाख रूपये देण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी केल्या होत्या. मात्र तसे न करता हा साडेपाच कोटीचा निधी पालकमंत्र्यांची परवानगी न घेता चक्क नाट्यगृहाच्या कामासाठी परस्पर वळविण्यात आला. या विषयावरून पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व जिल्हा नियोजन अधिकारी दिनेश वाघ यांना चांगलेच धारेवर धरले. जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करीत ‘सरकार आम्ही आहोत की तुम्ही?’ असा जाब विचारला. परवानगी न घेता निधी वळता केलाच कसा? यापुढे असे होता कामा नये अशा शब्दात जिल्हाधिकार्‍यांना चांगलेच सुनावले.

तीन महिन्यांनी खर्चाचा आढावा द्या
बैठकीत पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी विभागनिहाय प्राप्त झालेला निधी, खर्च यांची आकडेवारी घेतली. यात बहुतांश यंत्रणांकडुन निधी खर्चाबाबत अपेक्षित आकडेवारी न मिळाल्याने दर तीन महिन्यांनी झालेला खर्च ई-मेलद्वारे सादर करण्याचे आदेश पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी अधिकार्‍यांना दिले.

उड्डाणपुलाच्या कामात तांत्रीक अडचणी
शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या कामासाठी काही तांत्रीक अडचणी येत आहेत. शासनाची तयारी पुर्ण झाली असुन हा पुल पाडतांना वळण रस्त्यांचाही विचार करावा लागणार आहे. यासंदर्भात रेल्वेच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली जाणार असल्याचे ना. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

अवैध वाळु वाहतुकीविरोधात कारवाई
अवैध वाळु वाहतुकीला नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने मोक्कासारखा कायदा केला आहे. त्याअंतर्गत अवैध वाळु वाहतुकदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश ना. पाटील यांनी दिले.

नाट्यगृह आजपासून खुले होणार!
मायादेवी नगर परीसरात नव्याने बांधण्यात आलेल्या बंदीस्त नाट्यगृहाला गेल्या सहा महिन्यापासुन लोकार्पणाची प्रतिक्षा लागली आहे. याविषयावर पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी नारळ फोडण्यासाठी कुणाचीही वाट पाहू नका. उद्यापासुनच नाट्यगृह वापरासाठी खुले करा असे आदेश बांधकाम विभागाला दिले. त्यामुळे उद्या दि. 3 पासुन हे बंदीस्त नाट्यगृह नाट्यकलावंतांसाठी खुले होणार आहे.

समांतर रस्त्यासाठी 15 दिवसात निविदा
बैठकीत समांतर रस्त्याच्या कामाचाही आढावा ना. पाटील यांनी घेतला. नहीचे अधिकारी सिन्हा यांनी समांतर रस्त्यांतर्गत उड्डाणपुलांचेही कामे असल्याने आराखड्यात त्याचा समावेश केला जाणार असल्याचे सांगितले. तसेच येत्या 15 दिवसात समांतर रस्त्यासाठी निवीदा काढण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. पाटील यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!