Type to search

सरकारी ममता फक्त मुक्या प्राण्यांसाठी?

अग्रलेख संपादकीय

सरकारी ममता फक्त मुक्या प्राण्यांसाठी?

Share
दुष्काळामुळे सरकारने जनावरांसाठी अनेक चारा छावण्या सुरू केल्या आहेत. बीड परिसरातील छावण्यांत सुमारे पाच हजार शेतकर्‍यांनी जनावरे दाखल केली आहेत. त्या जनावरांची देखभाल करण्यासाठी ते शेतकरीही तेथे थांबत आहेत. सरकारच्या छावण्यांत जनावरांना चारा मिळतो;

पण त्यांच्या देखरेखीची किंवा छावण्यांतील साफसफाईची कुठलीही व्यवस्था सरकारी योजनेत नाही. छावण्यांत मुक्कामी असलेल्या अनेक शेतकर्‍यांची गावे छावणीपासून दूर आहेत. मात्र जनावरांच्या मालकांच्या खाण्या-पिण्याची सोय करण्याची जबाबदारी सरकारी सेवक घेत नाहीत. ते तरी बिचारे काय करणार? दुष्काळग्रस्तांची ही अवस्था लक्षात घेऊन बीडमधील ‘शांतिवन’ या सामाजिक संस्थेने शेतकर्‍यांच्या एकवेळ जेवणाची सोय केली आहे.

संख्या मर्यादित तोवर आसपासच्या खेड्यांतील शेतकरी कुटुंबांनी छावणीत थांबलेल्या शेतकर्‍यांची भाजी-भाकरीपुरती सोय केली; पण तीव्र उन्हाळ्यामुळे अन्न छावणीच्या ठिकाणी पोहोचताना नासू लागले. मग मात्र जनावरांच्या मालकांची उपासमार सुरू झाली. शांतिवन संस्थेच्या पुढाकाराने सध्या दहा छावण्यांतील सुमारे पाच हजार शेतकर्‍यांना दिवसातून भात आणि भाजीचे एक जेवण मिळत आहे. बीड जिल्ह्यात सहाशेहून अधिक चारा छावण्या सुरू आहेत.

त्यापैकी आवश्यक तेथे हा उपक्रम सुरू करण्याचा मनोदय ‘शांतिवन’च्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. जगाचा अन्नदाता वा पोषणकर्ता शेतकरी उपाशी का राहावा? या विचाराने ‘शांतिवन’च्या कार्यकर्त्यांनी हा अनुकरणीय उपक्रम सुरू केला. तथापि गाजावाजा करून जनावरांवर दयाळू होणार्‍या सरकारने त्या जनावरांसोबत राहणे भाग असलेल्या शेतकर्‍यांच्या खाण्या-पिण्याचाही विचार करू नये ही सरकारी कामकाजाची नमुनेदार झलक आहे. अनेक गावांत सरकारी पाणी योजनेप्रमाणे टाक्या बांधल्या जातात.

मात्र त्यातील पाणी गावकर्‍यांना नेण्यासाठी साधे नळ बसवायला वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. त्यातलाच हा दुसरा प्रकार! बीडकरांचे सुदैव! ‘शांतिवन’च्या कार्यकर्त्यांना ही उणीव दूर करावीशी वाटली. राज्यातील अनेक गावांत दुष्काळाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. चारा-पाण्याची व्यवस्था जनावरांसाठी करण्याची सहृदयता शासनाने दाखवली; पण त्या जनावरांचा सांभाळ करणार्‍या शेतकर्‍यांनाही पोट असते हे मात्र प्रशासन यंत्रणेला ठाऊक नसावे?

जनावरे छावण्यांमध्ये सोडून शेतकरी घरी निघून गेले तर त्या जनावरांची देखभाल सरकारी सेवकांना झेपू शकेल का? पाहणी करण्यासाठी वरचेवर जनतेच्या पालकांचे व राज्याच्या मालकांचे दौरे सरकारी खर्चाने सुरू झाले आहेत; पण जनावरांच्या काळजीपोटी छावणीत थांबणार्‍या शेतकर्‍यांच्या पोटाची व्यवस्था बघावी हेही त्यांना सुचू नये?

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!