समृध्दीसाठी पोलीस बळाचा वापर ; प्रशासनाला सहकार्य करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

नाशिक जिल्ह्यात अवघे 22 टक्के सर्व्हेक्षण पूर्ण

0

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे सर्व्हेक्षण सुरू असून गावागावातून या सर्व्हेक्षणास होत असलेला विरोध पाहता प्रशासन आणि शेतकरी यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

मात्र मोजणीच्या कामात व्यत्यय येऊ नये आणि हे काम कायदेशीररित्या व्हावे यासाठी आता महसूल विभागाने पोलीस प्रशासनाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे महसूल आणि पोलीस विभागाच्या समन्वयातून या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.यांनी केले. ग्रामस्थांशी चर्चा करून सामंजस्याने मोजणीचे काम करण्यात यावे, असेही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी मोजणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, राहुल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक गिरे आणि दत्तात्रय घोगरे आदी उपस्थित होते.

समृध्दी महामार्गासाठी जागेची मोजणी भूमी अभिलेख विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. या प्रकल्पाला अगोदरपासूनच शेतकर्‍यांचा विरोध असून मोजणी करण्यासाठी जाणार्‍या अधिकार्‍यांना ग्रामस्थ पिटाळून लावत आहेत. सर्व्हेक्षणाच्या कामात येणार्‍या अडचणी लक्षात घेता प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होतील, असे मतही अधिकार्‍यांनी नोंदवले.

मुंबई, नागपूर हा महामार्ग मराठवाडा, कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राबरोबरच 22 जिल्ह्यांना जोडणारा आहे. सर्व जिल्ह्यात सर्व्हेक्षणाचे काम प्रगतिपथावर असून नाशिक जिल्ह्यात मात्र केवळ 22 टक्के सर्व्हेक्षण झाले आहे. त्यामुळे याबाबत राज्य सरकारकडूनही प्रशासनावर दबाव वाढत आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात या प्रकल्पाविरोधात संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र बनत चालला असून किसान सभेनेही याविरोधात आंदोलन छेडले आहे. सर्व्हेक्षणासाठी गावात जाणार्‍या अधिकार्‍यांवर शेतकर्‍यांकडून विरोध होत असल्याने कामात अडथळे निर्माण होत आहे.

याकरिता आता पोलिसांच्या मदतीने सर्व्हेक्षणाचे काम करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. मात्र पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या समन्वयातून ग्रामस्थांशी चर्चा करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिल्या. त्यामुळे यापुढे या प्रकल्पाचे काम पोलिसांच्या मदतीने सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

LEAVE A REPLY

*