‘समृध्दी’साठी आता भूसंपादन

जमिनीचा मोबदला दोन टप्प्यांत

0

नाशिक | दि. १४ प्रतिनिधी – नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी लँड पुलिंगसह जमीन संपादनाचा प्रस्तावही शासनाने खुला ठेवला आहे. त्यामुळे २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसारच जमीन संपादित करण्यात येईल, असे सांगून शेतकर्‍यांना दोन टप्प्यांत जमिनीचा मोबदला दिला जाईल. त्याशिवाय जमिनीचा ताबा घेणार नाही, असा निर्वाळा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिला. त्यामुळे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी शेतकर्‍यांकडून प्रशासनाला आता प्रतिसादाची अपेक्षा आहे.

राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मंुंंबई समृध्दी महामार्गासाठी प्रशासनाने लँड पुलींग अर्थात भूमीसंचयनाची प्रक्रिया स्विकारली. राज्यातील २४ जिल्ह्यांना जोडणारा ७१० किलोमीटरचा हा महामार्ग नाशिक जिल्हयातील इगतपुरी आणि सिन्नर या दोन तालुक्यांतून सुमारे ९७ किलोमीटर लांबीचा असणार आहे.

इगतपुरी तालुक्यातून ३४ कि.मी. तर सिन्नर तालुक्यातील ६३ कि.मी. मार्गाचा यात अर्ंतभाव आहे. या महामार्गासाठी भूमिअधिग्रहणाऐवजी भूमीसंचयन (लँड पुलींग) प्रक्रिया शासनाने स्विकारली. मात्र प्रकल्पाच्या सुरूवातीलाच जिल्हयातून विरोध सुरू झाला. ज्या तालुक्यांतून हा महामार्ग जात आहे त्या तालुक्यांतील शेतकर्‍यांनी या प्रकल्पालाच विरोध केला आहे.

काही शेतकर्‍यांनी लँड पुलिंग पध्दतीला विरोध दर्शवला तर काहींनी प्रकल्प पूर्ण होउनही शासनाकडून मोबदला मिळत नसल्याने यास विरोध दर्शवला. काही शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत. मात्र केवळ वाढीव मोबदला मिळावा, अशी त्यांची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी शासनाने आता भूसंपादनाचाही पर्याय शेतकर्‍यांपुढे खुला केला आहे. या प्रक्रियेत थेट शेतकर्‍यांसोबतच चर्चा केली जाणार आहे.

दर निश्‍चित होताच त्याच्या साठेखतावर निम्मा मोबदला आणि ताबा घेण्यापूर्वी दुसरा मोबदला दिला जाईल, पूर्ण मोबदला दिल्याशिवाय जमिनीचा ताबा घेतला जाणार नाही, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

अन्याय होणार नाही
शेतकर्‍यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या संमतीनेच जमीन घेतली जाईल. समृध्दी महामार्गासाठी शासनाने लँड पुलिग पध्दतीसह भूसंपादनाचा प्रस्तावही समोर ठेवला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी यासाठी पुढे यावे. २०१३ च्याच कायद्यानुसार जमिनीचे संपादन केले जाईल. शेतकर्‍यांनी प्रशासनाशी चर्चा करावी.
राधाकृष्णन बी. जिल्हाधिकारी

LEAVE A REPLY

*