‘समृद्धी’साठी जमीन खरेदीचा शुभारंभ; शेतकर्‍यांचे समाधान करुनच जमीन खरेदी-शिंदे

0
नागपूर । ‘समृद्धी’ महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकर्‍यांचा विरोध असताना आज थेट जमीन खरेदीचा शुभारंभ आज नागपूर येथून झाला. ‘समृद्धी’ महामार्ग हा राज्याच्या कृषी व औद्योगिक विकासाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने शासनाने या प्रकल्पाला प्राधान्यक्रम दिला आहे. या प्रकल्पासाठी जमीन खरेदी करताना शेतकर्‍यांना विश्वासात घेऊन तसेच त्यांचे संपूर्ण समाधान करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हिंगणा तालुक्यातील महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी शेतकर्‍यांकडून थेट जमीन खरेदी करण्यात आली. त्याप्रसंगी शेतकर्‍यांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे बोलत होते. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी 6 शेतकर्‍यांनी शासनाने जाहीर केलेल्या दरानुसार शेत जमिनीची नोंदणी करुन दिली. या जमिनीच्या नोंदणीवर साक्षीदार म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: उपस्थित राहून स्वाक्षरी केली.

या महामार्गासाठी शेतजमीन उपलब्ध करुन दिल्याबद्दल शेतकर्‍यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, नागपूर जिल्ह्यातून या मार्गासाठी जमीन खरेदीचा शुभारंभ होत आहे. शेतकर्‍यांना मोबदल्या संदर्भात असलेल्या शंका तसेच संपूर्ण समाधान करण्यासाठी जिल्हाधिकारी उपलब्ध आहेत. शेतकर्‍यांनी या संदर्भात कोणावरही विश्वास न ठेवता महसूल अधिकार्‍यांकडून समाधान करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नागपूर-मुंबई या दोन शहरांमधील अंतर केवळ सहा तासात पूर्ण होणार असल्याचे सांगताना ते पुढे म्हणाले की, विकास प्रकल्पांसाठी सर्वांनी एकत्र येवून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे. या संदर्भात शेतकर्‍यांचे प्रश्न असल्यास ते सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये निर्णय घेण्यात येईल. हा प्रकल्प पूर्ण करताना शेतकर्‍यांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी सुद्धा घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, एमएसएसआरडीसीचे मुख्य अभियंता श्री.चॅटर्जी, कार्यकारी अभियंता श्री.कळसगावकर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*