‘समृद्धी’विरोधात आंदोलन तीव्र करणार ; किसान सभेचा इशारा; प्रकल्प रद्द करण्याची मागणी

0

नाशिक : समृद्धी महामार्गाला जमिनी देण्यास विरोध दर्शवणार्‍या शेतकर्‍यांनी आता हा प्रकल्पच रद्द करा, अशी मागणी केली आहे. तसेच या प्रकल्पासाठी करण्यात येणारी मोजणी तातडीने थांबवण्यात यावी अन्यथा नाशिक जिल्ह्यातील शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्पात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी तालुक्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यामुळे या तालुक्यातील जमिनी मोठ्या प्रमाणावर संपादित कराव्या लागणार आहेत.

यापूर्वी शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी या दोन्ही तालुक्यातील शेतकर्‍यांनी जमिनी दिल्याने जिल्ह्यातील अजून किती जमिनी सरकार संपादित करणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. भूमी अधिग्रहण कायद्यानुसार 70 टक्के शेतकर्‍यांचा विरोध असल्यास प्रकल्प करू नये, असे नमूद असतानाही प्रशासन पोलीस बळाचा वापर करून जमीन मोजण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला.

बाधित शेतकर्‍यांव्यतिरिक्त अन्य लोक या प्रकल्पाला विरोध करीत असतील अथवा शेतकर्‍यांना पाठबळ देत असतील तर कायदेशीर कारवाई करू या जिल्हाधिकार्‍यांच्या इशार्‍याचाही किसान सभेने निवेदनाद्वारे निषेध नोंदवला आहे. शेतकर्‍यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये, असे या निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग त्वरित रद्द करण्यात यावा तसेच जमिनीची मोजणी थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा किसान सभेचे जिल्हाध्यक्ष भास्कर शिंदे, प्रा. के. एन.आहिरे, देवीदास भोपळे, राजू देसले, नामदेव राक्षे आदींनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*