समाज कल्याण वसतीगृहातील मुलींनी वाचले समस्यांचे पाढे

0

जि.प. समाज कल्याण आयुक्त कार्यालयाच्या वसतीगृहांमधील व्यथा

 

सागर शिंदे

अहमदनगर : राज्य शासनाने आदिवासी आश्रम शाळांच्या तपसणीनंतर समाजकल्याणच्या शाळांच्या तपासणीचे आदेश दिले होते. त्यात नगरमध्ये जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणार्‍या 28 आश्रमशाळा व 18 वसतीगृह तर समाजकल्याण आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत असणार्‍या 29 आश्रमशाळा व 10 वसतीगृह अशा 85 शाळा व वसतीगृहांची तपासणी करण्यात आली आहे. त्यात महिलींच्या शारिरीक समस्यांविषयी शाळा व्यवस्थापन उदासिन असल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचे पाढेच मुलींनी वाचून दाखविले आहे.

 
आदीवासी आश्रमशाळांमध्ये 24 विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली होती. त्यानंतर सर्व जिल्ह्यातील आदीवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असणार्‍या शाळांची तपासण्या करण्याचे आदेश शासनाने दिले होते. जिल्ह्यात एकात्मिक बालविकास विकास अंतर्गत सुरू असणार्‍या 40 शाळांची तपासणी करण्यात आली आहे. हा अहवाल शासनासमोर मांडण्यात आला असून त्यांच्यावर उपायोजना सुरू आहेत. या तपासणीनंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असणार्‍या जिल्हा परिषद व समाजकल्याणच्या शाळांच्या तपासण्या जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.

 
अकोले, संगमनेर, नगर शहर, श्रीरामपूर, कर्जत जामखेड, पाथर्डी, शेवगाव यांच्यासह अन्य तालुक्यांमधील 85 शाळांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यात काही शाळांमध्ये धक्कादायक माहीत पुढे आली आहे. मात्र, काही शाळांचे काम पथदर्शी असल्याचे शासनाला पाठवण्यात आलेल्या अहवालात आहे.

 
समाजकल्याण व जिल्हा परिषदांच्या निगराणीखाली चालणार्‍या या शाळांमध्ये मुलींच्या समस्या सर्वाधिक असल्याचे तपासणीत पुढे आले आहे. मुलींच्या मासिक पाळीसाठी त्यांना आवश्यक असणार्‍या वस्तूंचा पुरवठा केला जात नाही. वैद्यकीय अधिकार्‍यांकडून तपासणी केली जात नाही. काही शाळांचे शिक्षक, सुरक्षा रक्षक व अधिक्षक मद्य पीत असून त्यांच्याकडून विद्यार्थींनींना त्रास दिला जात असल्याच्या समस्या मुलींना अधिकार्‍यांच्या कानावर घातल्या आहेत. शाळेतील विद्यार्थीनींच्या शौचालयास व स्नानगृहास दारे खिडक्या नाहीत. शाळेत अथवा वसतीगृहात वीज नाही. वेळीच जेवण नाही, अद्याप शालेय गणवेश नाही, पाण्याची सुविधा, फॅन, स्टेशनरी, अभ्यासाला वेळ, पुरेसे जेवण अशा अनेक सुविधा मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी तपासणी करण्यासाठी गेलेल्या अधिकार्‍यांना सांगितले आहे.

 
अनेक वेळा जेवणात आळ्या देखील खाव्या लागतात अशी कैफीयत विद्यार्थ्यांनी मांडली. त्यामुळे आदीवासी शाळांप्रमाणेच समाजकल्याणच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाताहात होत असल्याचे चित्र उघड झाले आहे. विद्यार्थी अशा प्रकारच्या नरक यातना सोसत असतील तर शासकाडून होणारा कोट्यावधींचा खर्च जातो कोठे हा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

 

अकोल्यात मुलींच्या समस्या गंभीर
अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील शाळेत मुलींच्या समस्या गंभीर आहेत. शारिरीक समस्यांबाबत देखील व्यवस्थापन गंभीर नाही. तसेच तेथे महिला अधिक्षक नाही, पाण्याची समस्या, आहारात पालेभाज्या, वेळीच जेवण, सुरक्षा असे अनेेक प्रश्‍न मुलींनी एरणीवर आणले आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात आदीवासी विद्यार्थ्यासह मागासवर्गीयांना देखील न्याय हक्कांपासून वंचित रहावे लागत असल्याचे अहवालात उघड झाले आहे.

 

सामाजिक दडपण गरजेच
या भ्रष्ट व्यवस्थेवर सामाजिक दडपण आणणे गरजेचे आहे. निवृत्त शिक्षक, अधिकारी, पत्रकार, ग्रामपंचायत, स्थानिक सामाजिक संस्था यांनी अशा शाळांमध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे. त्यांची समिती स्थापन करुन शाळा व वसतीगृहांवर नियंत्रण ठेवल्यास योग्य अंमलबजावणी होईल. तसेच मुलींच्या समस्यांसाठी टोलफ्री क्रमांक आवश्यक आहे, असे झाल्यास विघातक घटनांवर योग्य मार्ग निघेल.
– हेरंब कुलकर्णी (सामाजिक कार्यकर्ते)

 

…तर लैंगिक समस्या उघड होतील
मुलींच्या समस्या समजून घेण्या इतपत जर व्यवस्थापन समजदार नसतील अशा शिक्षकांचे व अधिकार्‍यांचे राजीनामे घेतले पाहीजे. संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करुन त्यांना खात्यातून बडतर्फ करावे. फळे, पालेभाज्या, गणवेश, स्टेशनरी मिळत नाही तर ती जाते कोठे याची चौकशी होणे आवश्यक आहेे. तपासणीत जर पारदर्शकता आली तर जिल्ह्यात देखील मुलींच्या लैंगिक समस्या उघड होऊ शकतात.
– संदीप घोलप (सामाजिक कार्यकर्ते)

LEAVE A REPLY

*