समाजाच्या सहिष्णुतेलाही वाकुल्या?

0
केरळमधील नैसर्गिक आपत्तीचे दुष्परिणाम केरळवासियांना अजून बराच काळ भोगावे लागतील. पाऊस आता कमी होत असला आणि परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असली तरी रोगराईचे संकट उभे राहिले आहे. पुरामुळे सर्वत्र पसरलेल्या दलदलीमुळे साथीचे रोग फैलावण्याचा धोका आहे.

पिण्याच्या पाण्याचे व अन्नाचे दुर्भिक्ष्य आहे. खेड्यापाड्यांतील व दुर्गम भागातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास बराच काळ जावा लागेल. या महापुरात लाखो केरळवासियांनी आपले सर्वस्व गमावले आहे. त्यांच्या मदतीसाठी सामान्यांचे हजारो हात पुढे सरसावले आहेत.

अक्षया या तामिळनाडूतील बारा वर्षीय चिमुकलीला हृदयाचा आजार आहे. तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे. त्यामुळे तिच्या शस्त्रक्रियेसाठी समाजाला आवाहन करून पैसे जमा केले जात आहेत. जमवलेल्या रकमेपैकी पाच हजार रुपये अक्षयाने केरळ पूरग्रस्तांसाठी पाठवले आहेत.

अहमदनगर येथील देहविक्रय करणार्‍या महिलांनी एकवीस हजार रुपये सरकारकडे सुपूर्द केले आहेत. महिनाअखेरपर्यंत एक लाख रुपये जमा करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. अहमदाबादमधील इस्लामिक विद्यार्थी संघटनेने ईदनिमित्त निधी संकलन केले. तेथील केरळ समजाम संस्थेचे स्वयंसेवक केरळमध्ये सेवाकार्य करीत आहेत. सायकल घेण्यासाठी जमवलेले पैसे एका चिमुकलीने याकामी दिले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अनेक शाखांनी औषधांचा साठा आणि एक कोटींपेक्षा जास्त निधी केरळच्या शाखेकडे पाठवला आहे. त्यात नाशिकही सामील आहे. अशी असंख्य उदाहरणे रोज घडत आहेत. ही सगळी दु:खितांचे अश्रू पुसण्यासाठी सामान्य माणसाने दाखवलेल्या संवेदनेची उदाहरणे आहेत.

पावलोपावली उपेक्षा आणि अवहेलना सहन करणार्‍या वारांगणांनीसुद्धा आपल्या घासातील घास केवळवासियांकडे पाठवावा हा दातृत्वाचा अनोखा आदर्श आहे. ‘स्वत: भुकेले असताना ताटातील अर्धी भाकरी दुसर्‍या भुकेलेल्यांना देणे ही उदात्त संस्कृती आहे, असे विनोबा भावे म्हणत. तन-मन-धनाने केरळवासियांच्या मागे उभे राहणार्‍या समाजाने भारतीय संस्कृतीचे आचारण कृतीने दाखवले आहे.

तथापि याही वेळी समाजातील काही विकृतीसुद्धा समाज माध्यमांवर डोकावल्या आहेत. केरळवासियांना मदतीची गरज नसल्याचे सांगणार्‍या अनेक चित्रफिती व संदेश व्हॉटस्अ‍ॅपवर फिरत आहेत. ही असुरी असहिष्णुतासुद्धा या संकटाच्या वेळी उफाळून यावी हेही देशाचे दुर्दैवच! पण त्याला आळा घालण्यास पुरेसे कणखरपण नेतृत्व का दाखवू शकत नाही?

LEAVE A REPLY

*