सभापतींच्या आसनासमोर भाजप नगरसेवकांची घोषणाबाजी

0
जळगाव  / शहरात गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने टंचाई सदृष्ट परिस्थितीत निर्माण झाली होती. पाणीपुरवठा या विषयावर भाजपच्या नगरसेवकांनी चर्चा सुरु करताच सभापती डॉ.वर्षा खडके यांनी बोलू दिले नाही.
त्यामुळे भाजप नगरसेवकांनी घोषणाबाजी करत सभापतींच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आणि 10 मिनिटाच सभा गुंडाळली.

मनपा स्थायी समिती सभा सभापती डॉ.वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित होते. सभा सुरु झाल्यावर भाजपाचे सदस्य सभागृहात आलेत.

पर्यायी व्यवस्थेची मागणी
शहरात गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पाण्यासाठी पर्यायी व्यवस्थेवर चर्चा करावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केली. मात्र सभापती खडके यांनी सभा सुरु झाली आहे. असे म्हणताच पृथ्वीराज सोनवणे यांनी आक्रमक भूमिका घेत जळगावकरांच्या प्रश्नासाठी चर्चा झालीच पाहिजे. अशी मागणी लावून धरली.

सभापतींना घेराव
भाजपा नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी सभापतींना उद्देशून तुमच्या घरी बोअरींग असल्याने पाणी टंचाई जाणवली नाही, असा आरोप केला. यावर सभापती डॉ.खडके यांनी वैयक्तिक बोलू नका असे म्हणत नगरसचिवांना विषय पत्रिकेवरील विषय घ्या अशी सूचना केली. त्याचवेळी पाण्यावर चर्चा न झाल्यास सभा होवू देणार नाही. असा भाजपच्या नगरसेवकांनी इशारा दिला. पाण्याच्या प्रश्नांवर चर्चेस सभापती डॉ.वर्षा खडके मान्यता देत नसल्याचे पाहून उज्वला बेंडाळे, पृथ्वीराज सोनवणे, नवनाथ दारकुंडे यांनी सभापतींना घेराव घालून पाण्यावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र पाण्यावर चर्चा न झाल्याने शेवटी विरोधकांनी घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. सत्ताधारी जळगावकरांना वेठीस धरत असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला.

10 मिनीटात सभा गुंडाळली
विरोधकांच्या घोषणाबाजीतच विषय पत्रिकेवरील 11 विषय 10 मिनिटात मंजूर सभा गुंडाळली. सभापतींनी पाण्यावर चर्चा न करताच सभागृहातून काढता पाय घेतला. त्यामुळे विरोधकांनी नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*