सब मुमकीन है!

0
भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष असल्याचा डांगोरा फक्त पक्षधुरीणच मिरवतात असे नाही. पक्षातील हौशा, नवशा, गवशांपासून काल परवा या पक्षात प्रवेश केलेले पक्षाचे नवखे सदस्यसुद्धा मुक्तकंठाने त्या शिस्तीचे गोडवे गातात. तथापि राजकारणाच्या बदलत्या पटावर पक्षाच्या सांस्कृतिक शिस्तीचे नव-नवे आविष्कार जनतेला बघावयास मिळत आहेत.

पक्षशिस्तीच्या नावाखाली भाजपच्या व्यासपीठावरसुद्धा अनेकांच्या हस्तकलाविष्काराला मुक्त संधी आता मिळू शकते इतकी उदार सांस्कृतिक शिस्त व नीती पक्षाने स्वीकारली असावी का? असे वाटणारी घटना परवाच अमळनेरमध्ये घडली. जळगावचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पक्षातीलच दोन गट एकमेकांवर लाथाबुक्क्यांनिशी तुटून पडले. पक्षाच्या दोन वरिष्ठ मंत्र्यांसमक्ष मल्लविद्येचा देखणा प्रयोग सादर झाला.

नेते व कार्यकर्ते एकमेकांना भिडले. एक माजी आमदार भाजप जिल्हाध्यक्षांच्या रागाचे लक्ष्य ठरले. जिल्हाध्यक्षांसोबत कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा (की शिस्तशीर टोळी?) सभेत उपस्थित होता. सर्वत्र सत्तारूढ पक्ष व मुख्यमंत्र्यांचे ‘संकटमोचक’ असा किताब मिळवलेले मंत्रिमहोदयसुद्धा उपस्थित होते. सुदैवाने इतर कार्यकर्त्यांना मिळालेला लाथा-बुक्क्यांचा प्रसाद त्यांच्या वाट्याला आला नाही.

मात्र राज्यात सर्वत्र असलेला त्यांचा दबदबा त्यांच्याच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवर प्रभाव पाडू शकला नाही. झालेल्या घटनेच्या साग्रसंगीत ध्वनिचित्रफिती अगदी थोडक्या वेळात अनेक वृत्तवाहिन्यांवर पुन:पुन्हा झळकत राहिल्या. सत्तारूढ पक्षाच्या शिस्तीच्या त्या सांस्कृतिक दर्शनाने मराठी जनता नक्कीच भारावली असेल. मंत्रिमहोदयांची उपस्थिती कार्यकर्त्यांना आपले कसब दाखवण्याची विशेष प्रेरणा ठरली की मंत्र्यांचा दबावही कार्यकर्त्यांना रोखू शकला नाही ते उपस्थित कार्यकर्तेच जाणे!

या सर्व रणकंदनानंतरसुद्धा पक्ष कार्यकर्ते एकदिलाने आणि मजबुतीने निवडणुकीत पक्षाचा प्रचार करतील याबद्दल मात्र अनेक उपस्थित ग्वाही देत होते. ती ग्वाही किती प्रभावी ठरते हे नजीकच्या काळातच स्पष्ट होईल. पक्षशिस्तीची ऐशीतैशी करण्याचा पक्षातील हा पहिलाच प्रसंग नाही.

याआधीही अशा घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशात कुंभमेळा रंगला असताना पक्षात मात्र नेत्यांचा अहंकार उचंबळून आला होता. लखनौत आयोजित जिल्हा नियोजन बैठकीत आमदार आणि खासदारांनी एकमेकांना चपलेले बडवले होते. ज्या पक्षात ज्येष्ठ नेते ‘ब्र’ही उच्चारू शकत नाही त्या पक्षाचे तळाचे कार्यकर्ते मात्र आपले मल्लविद्याविशारदपण सिद्ध करण्यात गुंतलेले आहेत. हे चित्र किती आशादायक मानावे?

LEAVE A REPLY

*