सफाईच्या ठेक्यात १० टक्के हप्ता – महासभेत महापौरांचा गौप्यस्फोट

0

जळगाव | प्रतिनिधी :  शहरातील ५७ सार्वजनिक शौचालय ‘पे ऍण्ड युज’ तत्त्वावर देण्याबाबतच्या ठरावावर चर्चा सुरु असतांनाच भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, सुनील माळी यांनी आर्थिक दुर्बल घटकाकडून कुटुंबियांकडून ७० रुपयांऐवजी ४० रुपये आकारणी करण्याबाबत मुद्दा मांडला. या विषयावर चर्चा सुरु असतांनाच साफसफाईच्या ठेक्यात कोणकोणते नगरसेवक १० टक्के घ्यायचे हे मला माहित आहे. यादी उघड करायला लावू नका, असे म्हणत महापौर नितीन लढ्ढा यांनी काही नगरसेवक हप्ते घेत असल्याचा गौप्यस्फोट महासभेत केला.

शहरातील सार्वजनिक शौचालय पे ऍण्ड युज तत्त्वावर देवून वापर करणार्‍या कुटुंबियांकडून प्रति कुटुंबिय ७० रुपये दरमहा आकारणी करावी, अशी सूचना महापौर नितीन लढ्ढा यांनी मांडली. यावर सुनील माळी यांनी ७० रुपये जादा होत असल्याचे सांगितले.

तर पृथ्वीराज सोनवणे यांनी इतर महानगरपालिकेत ४० रुपये आकारणी आहे. त्यामुळे ७० रुपये आकारणी करण्याचा आग्रह का धरता? असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे  कैलास सोनवणे, सुनील महाजन, नितीन बरडे, संदेश भोईटे, अमर जैन, जितेंद्र मुंदडा यांनी पृथ्वीराज सोनवणे आणि सुनील माळी यांना विरोध केला.

त्यामुळे काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता. शौचालयाच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरु असतांनाच कैलास सोनवणे यांनी साफसफाईच्या ठेक्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरुन कैलास सोनवणे आणि अश्‍विनी देशमुख यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

कैलास सोनवणे – अश्‍विनी देशमुख यांच्यात शाब्दीक चकमक

शहरात साफसफाईबाबत यापुर्वी काही नगरसेवकांनी सफाईचा ठेका घेतला होता. त्यावेळी तक्रारी येत नव्हत्या. परंतु दुसर्‍यांनी घेतल्यामुळे खूप तक्रारी येतात, असे का? असा सवाल उपस्थित केला. यावर अश्‍विनी देशमुख यांनी मीच ३५०० तक्रारी केलेल्या आहेत. तक्रारी करु नये यासाठी मला मॅनेज करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.

खर तर महापौरांनी हप्ता घेत असलेल्यांची यादी जाहीर करावी, असे म्हणत सेटलमेंट करणार्‍यांचे नाव सिध्द करायचे असेल तर माझ्याकडे व्हीडीओ क्लिप्स आहेत. प्रोजेक्टर लावून त्या दाखवू शकते, असे म्हणत कैलास सोनवणे यांनी अश्‍विनी देशमुख यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक झाली. अधिकार्‍यांकडे  सफाईच्या ठेक्यात हप्ता जात असल्याचा आरोप देखील अश्‍विनी देशमुख यांनी केला.

LEAVE A REPLY

*