सप्टेंबरपासून जळगावात विमानसेवा – केंद्राच्या उड्डाण योजनेत समावेश : अडीच हजारात मुंबईची विमानवारी

0

जळगाव |  प्रतिनिधी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या केंद्र शासनाच्या उडाण या विमानमार्ग योजनेत जळगावचाही समावेश झाला असल्याने आता जळगावच्या विमानतळाला तब्बल पाच वर्षानंतर ‘अच्छे दिन’ येणार आहेत. दरम्यान सप्टेंबर महिन्यापासून जळगावकरांना जळगाव ते मुंबई अवघ्या २५०० रुपयात विमानप्रवास घडणार आहे.

जळगाव शहरालगत असलेल्या कुसुंबा गावाजवळ ३०० हेक्टर परिसरात जळगाव विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात आले होते. सन २०१० मध्ये भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दि.२३ मार्च २०१२ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते या विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले होते.

त्यावेळेला जळगाव विमानतळ हे जिल्ह्याच्या विकासाचे केंद्रबिंदू ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रवासी क्षमतेअभावी जळगावातील विमान वाहतुक सेवा ही थंडबस्त्यात पडली होती. यासंदर्भात अनेक कंपन्यांनी जळगाव विमानतळाची पाहणी देखील केली. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

गेल्या महिन्यात देखील एअरवेज ऍथोरीटीच्या पथकाने जळगाव विमानतळाची पुन्हा पाहणी केली आणि या ठिकाणाहून विमानवाहतुक सुरु करण्याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्यासमवेत बैठक देखील घेतली होती.

दरम्यान आज केंद्र शासनाने उडाण योजनेंतर्गत ४५ मार्ग जाहीर केले. यात राज्यातील त्यात नांदेड, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि जळगाव या पाच शहरांचा समावेश आहे. या पाचही शहरांमधून मुंबई, पुणे, हैद्राबाद अशी विमान वाहतुक सुरु होणार आहे.

यात जळगाव विमानतळावरुन जळगाव ते मुंबई अशी विमान वाहतुक डेक्कन एअरलाईन्स या कंपनीच्या माध्यमातून होणार आहे. येत्या सप्टेंबरपासून जळगावकरांना अवघ्या २५०० रुपयात जळगाव ते मुंबई असा विमानप्रवास करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महत्वाकांक्षी योजनेमुळे पाच वर्षानंतर का होईना जळगाव विमानतळाला ‘अच्छे दिन’ आले आहेत.

LEAVE A REPLY

*