सदाभाऊ खोत, सूर्यवंशी व मुख्यमंत्र्यांनी एका रात्रीत संप मॅनेज केला

0

शिंगणापुरात सकल मराठा समाज संघटनांच्या मंथन बैठकीत आरोप

 

सोनई (वार्ताहर) – महाराष्ट्रातील सर्व सकल मराठा समाज संघटनांची शनिशिंगणापुरात शेतकरी संप व मराठा आरक्षणसंबंधी मंथन बैठक झाली. यात मराठा आरक्षण समितीचे समन्वयक सुभाष जावळे यांनी शेतकरी संपास पाठिंबा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख अश्‍वत्थामा असा केला. त्यांनी रात्री जागून घुबडाचे काम केले आहे. सदाभाऊ खोत, जयाजीराव सूर्यवंशी यांनी एका रात्रीतून संप मॅनेज केला. या सूर्याजी पिसाळांचा सकल मराठा समाज संघटनाच्यावतीने निषेध यावेळी व्यक्त केला. सर्व मान्यवरांनी खासदार, आमदार व शासनाचा निषेध केला.

 

शनिशिंगणापुरात अखिल भारतीय सेवा संघ, छावा मराठा संघटना, शेतकरी संघटना यांनी सकल मराठा समाज संघटनांची शेतकरी संपास पाठिंबा देण्यासाठी व 9 ऑगस्टला मुंबईत मराठा मोर्चाची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

 

या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष मराठा आरक्षण समितीचे सुभाष जावळे यांनी अतिशय जहाल अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सदाभाऊ खोत, जयाजी सूर्यवंशी यांच्यावर एका रात्रीतून शेतकरी संप मॅनेज करून संपकरी शेतकर्‍यांत फूट पाडण्याचे काम केले असल्याची टीका केली. त्यांनी रात्रभर जागून घुबडाचे काम केले असले तरी आम्ही एवढे दूधखुळे नसून सोमवारी संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.

 
सर्व शेतकरी मराठा नसले तरी सकल मराठा समाज हा शेतकरी आहे. यामुळे मराठा संघटनांनी संपास जाहीर पाठिंबा देत मंत्री खोत व जयाजी सूर्यवंशी यांचा निषेध केला. शेतकरी संपात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजकारण करून संप मोडित काढण्यासाठी प्रयत्न केले. सदाभाऊ खोत यांच्यावर आमचा विश्‍वास होता पण या विश्‍वासाला तडा देण्याचे काम खोत व सूर्यवंशी यांनी केले.

 

 

आता उरलेले दोन दिवस आपले हातातील काम बाजूला ठेऊन संपात सहभागी होण्याचे आवाहन करत पुणे, मुंबई, ठाणे या तीन शहरांची जरी कोंडी आपण केली तरी संप 99 टक्के यशस्वी होऊन सरकार शेतकर्‍यापुढे झुकेल. मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष कृषिराज टकले यांनी सदाभाऊ खोत, शांताराम कुंजीर, जयाजी सूर्यवंशी यांचा जाहीर निषेध करत शेतकरी संपास पाठिंबा दिला.

 

 

 

कार्यक्रमास अनिल वाघ, अंकुश डांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पटारे, जिल्हाकार्याध्यक्ष कृष्णा पाटील दरंदले, नितीन कासार, गौतम भोसले, गणेश झगरे, शिवाजी कडू, बापूराव चितळे, शुभम वाघ, एकनाथ घोडके, महेश शेटे, गणेश सोनावणे, अविनाश दरंदले, प्रशांत सोनवणे, अविनाश येळवंडे, मनोज कुर्‍हाट उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*