Type to search

ब्लॉग

सत्तेसाठी एकाकी झुंज?

Share

शात नरेंद्र राज्यात देवेंद्र अशी घोषणा देण्यात आली आणि 2014 मध्ये राज्यातील मतदारांनी त्यासाठी कौलदेखील दिला. पण गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांची तुलना जरी अनुप्रास जुळवण्यापुरतीच असली तरी वास्तवात ती अनाठायी असल्याचे आता दिसून आले आहे. याचे सर्वात मोठे कारण नरेंद्राच्या प्रतिमेवर 2014 मध्ये राज्यातल्या जनतेने दिलेला जनादेश यावेळी दिलेला नाही. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा प्रवास खडतर असणार आहे ते सुरुवातीला मित्रपक्ष शिवसेनेकडून करण्यात येत असलेल्या असहकार्यावरून दिसून आले आहे. राज्यात ज्यावेळी शिवसेना अडून बसली आहे त्यावेळी केंद्रातून असे कोणतेच नेते भाजपतून सध्या पुढे आले नाहीत ज्यांनी मनधरणी, मध्यस्थी केली किंवा त्यासाठी पुढाकारा घेतला आहे.

एकमेव पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचे नाव घेतले जाते. मात्र त्यांनीसुद्धा येण्यास नकार दिला. अशावेळी राज्यातील नितीन गडकरी, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, आशिष शेलार यांच्यासारखे शिवसेनेशी दोन हात करू शकणारे किंवा चांगले संबंध असलेल्या भाजप नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता. पण तसाही त्यांनी तो घेतल्याचे दिसत नाही. याचे कारण मागील पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी एकहाती सत्ताकारण आणि राजकारण केल्याने अन्य कुणी नेते आता त्यांच्या नियंत्रणात राहिले नाहीत. देवेंद्र काय ते पाहून घेतील असेच त्यातून अप्रत्यक्षपणे ध्वनीत होताना दिसते. यावरून मग आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की, मुख्यमंत्री एकटे पडले का? त्यांना शिवसेनेची समजूत काढण्यात यश का येत नाही?

राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप-शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या संघर्षामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रस्थानी आहेत. कारण हा संघर्ष सुरू आहे मुख्यमंत्रिपदासाठी. निवडणूक निकालापूर्वी ‘आमचे ठरले आहे’ म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीस यांना आता नेमके काय ठरले आहे हेच सांगताना शिवसेनेकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून अडलेल्या शिवसेनेची समजूत काढण्यात फडणवीस यांना यश येत नसल्याचे सध्यातरी दिसून आले आहे.

2014 मध्ये त्यांनी शिवसेनेसोबत युती तुटली असताना सत्ता स्थापन करताना देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी केंद्रातील नेत्यांसह राज्यातील भाजप कोअर कमिटीची टीम खंबीरपणे उभी होती. यामध्ये शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि आशिष शेलार कायम आघाडीवर असायचे, तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता आणि वेळप्रसंगी नितीन गडकरी आपले संबंध वापरून ‘मातोश्री’ची नाराजी दूर करण्यासाठी पुढे सरसवायचे. मात्र सद्यपरिस्थितीत चंद्रकांत पाटील आणि मुनगंटीवार सोडल्यास यापैकी एकही जण फडणवीस यांच्या बाजूने राहिलेले दिसत नाहीत. काहींचा निवडणुकीत पत्ता कट झाला, तर काहींचा पराभव. नितीन गडकरींना तर राज्याच्या राजकारणात काहीच स्थान नसल्याचे सध्या चित्र आहे. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी पूर्वी थेट ‘मातोश्री’वर जाऊन स्वागत पंगत करत हसतखेळत तणाव दूर करण्याचा पर्याय असायचा,

मात्र मागील काही वर्षांत भाजपच्या श्रेष्ठींनी मोठ्या भावाला छोटा ठरवल्याने दार ठोठावून एका बैठकीत वाटाघाटी पूर्ण करण्याचा त्यांचा हुकुमी बाणा संपला आहे. मोदींच्या प्रतिष्ठेसाठी, अमित शहा यांच्या शब्दासाठी मागील काळात अनेकदा शिवसेनेला स्वत:ची मते बाजूला ठेवून मम म्हणावे लागले आहे. त्यामुळे आता आणीबाणीच्या प्रसंगात राज्यातील सत्तास्थापनेच्या वाटाघाटीसाठी केंद्रातूनही पुढाकार घेतला जात नसल्याचे चित्र आहे. एकेकाळी राज्यातील प्रत्येक नेत्याची बलस्थाने वापरून शिवसेनेशी विविध पातळीवर वाटाघाटी करणार्‍या भाजपत सध्या देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत अजून एक कारण सांगितले जाते ते म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री आमचा असा प्रचार सुरू असताना फडणवीस यांनी निवडणूक प्रचारादरम्यान मी पुन्हा येणार अशी काहीशी राजकीय अहंकार वाटेल अशी घोषणा केली. त्यामुळे भाजपच्या दुसर्‍या फळीतील नेते दुखावले आहेत. अनेक दिग्गज नेत्यांना जसे तिकिटाची वाट पाहायला लावण्यात आले.

त्यामुळे पक्षाचे अनेक वर्षांचे खंदे पुरस्कर्ते दुखावले गेले आहेत. फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याने मागील पूर्वेतिहास पाहता त्यांनाच काय ते पाहू दे, असा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा सूर दिसत आहे. मोठा फटका बसल्याने सध्या फडणवीस यांचे नेतृत्व पक्ष अडचणीत असूनही त्यांना कुणाची सहानुभूती मिळत नाही असेच दिसत आहे.

महाराष्ट्रात 220 जागा जिंकून स्वबळाची सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहणार्‍या भाजपचा वारू 105 जागांवर अडखळला. महायुती करूनसुद्धा सत्तास्थापनेचे घोडे अडले आहे. अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस यांची एकाकी झुंज सुरू आहे. शिवसेनेच्या आव्हानाला सामोरे जाण्यास त्यांच्या सोबत खंबीर नेता नाही.
किशोर आपटे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!