सत्ता, संपत्ती व दहशतीचा जोर लावूनही आमदारांना बहुमत मिळवता आले नाही ः गडाख

0

नेवासा (प्रतिनिधी)- आमदार मुरकुटे यांनी कुठल्याही थराला जाऊन नगरपंचायतमध्ये बहुमत मिळवायचे असा पण केला होता. सत्ता, संपत्ती व दहशतीचा मोठा वापर करूनही त्यांना बहुमत मिळवता आले नाही. नगराध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. शहरातील रस्ते, गटारीचे प्रश्‍न मार्गी लावून शहर स्मार्ट सिटी करू असा शब्द लोकप्रतिनिधींनी दिला आहे, याची आठवण आमदारांनी ठेवावी अशी प्रतिक्रिया माजी आमदार शंकरराव गडाख यांनी दिली.

 
नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीत नेवासा शहरवासीयांनी 17 पैकी 9 जागांवर क्रांतिकारी पक्षाचे उमेदवार निवडून दिले त्याबद्दल नेवासा शहराचे पक्षाच्यावतीने आभारी आहे असे सांगून गडाख म्हणाले, निवडून आलेल्या सर्व विजयी उमेदवारांनी शहराचे जे मूलभूत प्रश्‍न आहे त्यासाठी झटावे. आमच्या पक्षाच्या उमेदवारांवर नागरिकांनी विश्‍वास टाकला व बहुमत दिले व झालेल्या मतदानाच्या आकडेवारीत क्रांतिकारी पक्ष आघाडीवर असून आमच्या 3 उमेदवारांचा अगदी 1 ते 2 मतांनी पराभव झाला आहे.

 

 

नेवासा शहरात सामाजिक स्वास्थ कसे राहील यावरती ध्यान देणे गरजेचे आहे. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी खचून न जाता समाजसेवेचा वसा असाच अविरत चालू ठेवावा व जनतेच्या प्रश्‍नांसाठी लढा देत राहावा. 1 कॅबिनेट, 2 राज्यमंत्री, खासदार, आमदार यांनी नेवाशात येऊनही विरोधकांना बहुमत करता आले नाही याचे आत्मपरीक्षण लोककप्रतिनिधींनी केले पाहिजे. तसेच निष्ठावान भाजप व निवडणुकीत पराभूत झालेले भाजपसह सर्व पक्षाचे उमेदवार यांना सहानुभूती दाखविण्याऐवजी त्यांनी फक्त 6 जागा निवडून येऊनही शहरात मिरवणूक काढली व खोटे मोठेपण मिरवले असे गडाख यांनी सांगितले.

 

 

‘क्रांतिकारी’ने सहकार्याची भूमिका घ्यावी ः आ. मुरकुटे

 

नेवासा (का. प्रतिनिधी)- आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून क्रांतिकारी पक्षाने शहराच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका घ्यावी अशी प्रतिक्रिया आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी निकालाबाबत भ्रमणध्वनीवरून बोलताना व्यक्त केली.

 
आमदार मुरकुटे म्हणाले, नेवासा नगरपंचायतच्या निवडणुकीत जनतेने भाजपाच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी केला. शहरातील जनतेने भाजपाला चांगली मते दिल्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो. जनतेने पक्षावर मोठी जबाबदारी टाकली आहे. नगरपंचायतच्या विकास कामांचे नियोजन करावे लागणार आहे. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी, न्याय देण्यासाठी जनतेने जबाबदारी टाकली आहे.

 
आता निवडणूक संपल्याने आता राजकारणही संपवावे. क्रांतिकारी शेतकरी पक्षाने जनतेच्या विकासाच्या प्रश्‍नावर सहकार्याची भूमिका घ्यावी. विकासाच्या प्रश्‍नावर कोणतेही अडथळे आणू नयेत ही माझी व पक्षाची भूमिका आहे.

LEAVE A REPLY

*