सत्ता तर मिळाली, आता भाजपपुढे ध्येयपूर्तीचे आव्हान !

0

नाशिक । दि. 14 प्रतिनिधी – मुख्यमंत्र्यांच्या शहर दत्तक घेण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिककरांनी शहरात कमळ फुलवले. महापालिकेच्या 25 वर्षाच्या इतिहासात प्रथम एखाद्या पक्षाला बहुमत प्राप्त झाले आहे. आज महापौरपदी रंजना भानसी आणि उपमहापौरपदी प्रथमेश गिते यांच्या निवडीने भाजपचा सत्ताभिषेक झाला. मात्र आता सहज मिळालेली सत्ता टिकवण्याचे आणि निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेल्या ध्येयनाम्याची ध्येयपूर्ती करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.

खरा म्हणजे निवडणुकीपूर्वी शहरात भाजपची सत्ता येईल अशी चिन्हे नव्हती. त्यात शासकीय कार्यालयांचे स्थलांतर , धरणाचे पाणी , उद्योग , वीज , टीडीआर, कपाट यासंदर्भात सरकारकडून निर्णय होत असल्याने भाजपसंदर्भात नकारात्मकता वाढीस लागली होती.

त्यात निवडणूक काळात पक्षाकडून झालेल्या चुकांचीही भर पडली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दत्तक विधानाने भाजपला तारले हे मान्य करावे लागेल. त्यामुळे सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने नाशिककरांवर आश्वासनांची खैरातच केली. महापालिकेत सत्तेवर आल्यास केवळ शहर बस सेवाच नव्हे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची भरारीही भाजपने ध्ययेनाम्यात घेतली आहे.

त्याचप्रमाणे शहराच्या भविष्यकालीन पाणीपुरवठ्यासाठी त्र्यंबक तालुक्यातील बैजे येथे किकवी धरण बांधण्याचे वचन देण्यात आले आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास महापालिकेच्या मालकीचे हे पहिले धरण असेल. नाशिकच्या औद्योगिक वाढीसाठी स्वतंत्र औद्योगिक प्राधिकरण करणे, स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय आणि सहाशे खाटांचे रुग्णालय सुरू करणे , गुंडगिरीला आळा घालून अवैध धंद्यांचा बंदोबस्त करणार , शहरात पोतलसांची गस्त वाढवणार असे महापालिकेच्या अखत्यारीत नसेलेल्या अनेक योजना ध्येयनाम्यातून जाहीर करण्यात आल्या.

त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून नाशिककरांनी भाजपला सत्ताशकट प्राप्त करून दिली. त्यामुळे येत्या पाच वर्षात नाशिककरांच्या या आशा आकांक्षा भाजपला पूर्ण कराव्या लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दत्तक विधानाने संजीवनी दिल्याने सरकार नाशिककरांना भरभरून देईल, अशी अपेक्षा नाशिककरांना असून मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना ती पूर्ण करावी लागणार आहे.

महापालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता ही सर्व विकास शासनाच्या तिजोरीतूनच करावी लागणार आहे. मात्र सरकारच्याच तिजोरीवर असेलला भार पाहता हा पैसा नाशिककरांच्याच खिशातून काढावा लागणार आहे. मात्र असा निर्णय घेतांना नाशिककरांच्या नाराजीचा सामनाही भाजपला करावा लागेल. नवनिर्माणची स्वप्ने दाखवणार्‍या मनसेनेला पाच वर्षापूर्वी नाशिककरांनी डोक्यावर घेतले होते.

उद्योगपतींच्या माध्यमातून नवनिर्माणाच्या खुणा उमटल्याही परंतु जनतेच्या मूलभूत समस्या न सुटल्याने जनतेने मनसेनेला घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे मनेसेनेच्या वाट्याला आलेला अनुभव भाजपला घ्यायचा नसेल तर आतापासूनच त्यांची दक्षता घेत जनतेच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक राहील.

एकीकडे शहरात नियमित घंटागाडी येत नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालेला असताना शहर बससेवेसह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याचे वचन भाजपने दिल्याने शहरात घंटागाडी नियमित करण्याचे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.

जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील धरण बांधण्याचा विषय महापालिकेच्या ध्येयनाम्यात करून किकवी धरण बांधण्याचा घाट महापालिकेने घातला आहे. हे धरण बांधण्याच्या निविदाही आघाडी सरकारच्या काळात काढण्यात आल्या होत्या. मात्र सिंचन घोटाळ्याच्या नावाखाली या निविदा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे धरणाचे काम रखडले आहे. मात्र सुदैवाने जलसंपदामंत्रीच नाशिकचे पालकमंत्री असल्याने यावर समन्वयातून तोडगा काढावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

*