सत्ताधार्‍यांच्या विरोधानंतरही महामार्गाचे हस्तांतरण

0
नाशिक| दि.३१ प्रतिनिधी- महामार्ग हस्तांतरणाच्या वादग्रस्त ठरलेल्या निर्णयास सत्ताधारीच अनुकूल नव्हते तर मग हा निर्णय झालाच कसा, असा सवाल महापालिकेच्या वर्तुळात उपस्थित झाला आहे. बुधवारी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेवर या वादग्रस्त निर्णयाविरोधात मोर्चा काढल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दारू दुकानांचे समर्थन कुठल्याही परिस्थितीत करणार नसल्याचे सांगत याबाबत आमदार , पालिका आयुक्त आणि पालकमंत्र्यांशीही संवाद साधू, अशी भूमिका मांडली.

या भूमिकेवर या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महामार्ग हस्तांतरणाचा निर्णय आता चांगलाच वादात सापडला असून लोकप्रतिनिधीही याबाबत संभ्रमित भूमिका घेत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. महामार्ग हस्तांतरणामुळे छुप्या पद्धतीने कोर्टाच्या आदेशांच्या कचाट्यात सापडलेल्या दारू दुकानांना अभय दिले जात असल्याचा संदेश या हस्तांतरणानंतर नागरिकांमध्ये गेला आहे.

याबाबत महापौर रंजना भानसी यांच्याशी संवाद साधला असता, या प्रकारचा ठराव आमच्या काराकिर्दीत झाला नसून मी जनतेच्या बरोबर आहे, असे सांगत याप्रश्‍नी पालकमंत्री, आमदार आणि आयुक्तांकडे विरोध दर्शवू, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान राज्यमार्ग महापालिका प्रशासन डी नोटीफिकेशन करणार असल्याने या निर्णयास नागरिकांमधून वाढता विरोध आहे.

सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक ७ आणि ८ या दोन प्रभागांमधील भाजपच्या सुमारे आठ नगरसेवकांनीही नागरिकांचा कल लक्षात घेता या निर्णयाला विरोध दर्शविल्याने सत्ताधारी भाजपला या निर्णयाबाबत घरचा आहेर मिळाला आहे. दरम्यान, याबाबत सभागृहनेता दिनकर पाटील यांनीही या निर्णयास विरोध दर्शविला आहे. यामुळे सातपूर परिसरातील दारू दुकानांना अभय मिळत असल्यास याला विरोधच राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

LEAVE A REPLY

*