Type to search

सजीवसृष्टी धोक्यात?

ब्लॉग

सजीवसृष्टी धोक्यात?

Share

आता संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक पर्यावरण मूल्यमापन अहवालात पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा र्‍हास अगदी शंभर वर्षांच्या आत होण्याची चिन्हे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पृथ्वीच्या नैसर्गिक जीवनाधार यंत्रणेत झपाट्याने घट होत चालल्याने मानवाचा र्‍हास जवळ आल्याचा इशारा आघाडीच्या संशोधकांनी दिला आहे. पृथ्वीच्या आरोग्याविषयीच्या अत्यंत सखोल तपासणी अहवालातून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक पर्यावरण मूल्यमापन अहवालातील माहितीनुसार, जंगली सस्तन प्राण्यांच्या बायोमासमध्ये सुमारे 82 टक्के घट झाली आहे. निम्म्याहून अधिक परिसंस्था लुप्त झाल्या असून सजीवांच्या लाखो प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

गेली तीन वर्षे जगातल्या 450 हून अधिक संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक 5 पैकी 2 उभयचर प्रजाती आणि प्रवाळांच्या तसेच सागरी सजीवांच्या एक तृतीयांश प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वनस्पतींच्या परागीभवनासाठी उपयुक्त ठरणार्‍या कीटकांच्या प्रजातींविषयी या अहवालात स्पष्ट माहिती नाही. मात्र तरीही दर 10 पैकी एक प्रजाती नष्ट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परागीभवनाला धोका निर्माण झाल्याने सुमारे 57 कोटी 70 लाख वनस्पतींच्या प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. जमिनी निकृष्ट बनल्यामुळे जागतिक पातळीवर पीक उत्पादनात 23 टक्के घट झाली आहे.

गोड्या पाण्याच्या कमतरतेमुळे मानवी जीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. कोणत्याही गंभीर उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर आगामी काळात ही परिस्थिती भीषण स्वरूप धारण करेल, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

या अहवालाने जगभरातले देश आता खडबडून जागे झाले असून वेगवेगळ्या धोरणांचा विचार सुरू झाला आहे. व्यापारी कायद्यांमध्ये बदल करणे, जंगलांमध्ये आणि इतर हरित मूलभूत सुविधांमध्ये मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करणे यांसारख्या उपाययोजना योजण्याचा विचार सुरू झाला आहे.

आपण आपल्या वर्तनात मूलभूत बदल घडवून आणले तर अजूनही वेळ गेलेली नाही. आपण पृथ्वी पुन्हा एकदा हरित करू, असा आशावाद या अहवालाचे एक प्रमुख संशोधक डेव्हीड ओबुरा यांनी व्यक्त केला आहे. आपण फक्त पृथ्वीवरच्या उत्तम प्रजातींना वाचवण्याविषयी बोलत नसून सगळ्या प्रजाती वाचल्या तरच माणूस तग धरून राहू शकेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. आपणच आपल्या हाताने आपल्या परिसंस्था नष्ट करत असल्याने हे संकट ओढवल्याबाबत जागतिक पातळीवरच्या तज्ञांचे एकमत आहे.

या र्‍हासाची शेती आणि मच्छिमारी ही दोन प्राथमिक कारणे सांगितली जातात. जमिनी मोठ्याप्रमाणात नगदी पिकांखाली येत चालल्या असून मोठ्याप्रमाणात जंगलतोड होत आहे. जमिनीची प्रचंड धूप होत आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून जमिनीची सुपीकता नष्ट होत चालली आहे. एकदल वनस्पती रोगांना, दुष्काळाला आणि हवामानातल्या इतर बदलांना अधिक प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे जंगलतोड करून नव्याने लागवड करण्यात आलेल्या वनस्पती बदलत्या वातावरणात तग धरून राहण्यात कमी पडत आहेत. महासागरांवरही प्रदूषणाचा मोठा दुष्परिणाम झाला आहे. फक्त 3 टक्के सागरी परिसर मानवी दबावापासून मुक्त आहे. जगातल्या निम्म्या भागात औद्योगिक मच्छिमारी सुरू आहे.

त्यामुळे सुमारे एक तृतीयांशहून अधिक मासे नष्ट झाले आहेत. मानवी प्रजाती सध्या वार्षिक 60 अब्ज टन एवढ्या नैसर्गिक स्रोतांचा नाश करत आहे. 1980 च्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. लोकसंख्या 66 टक्क्यांनी वाढली आहे. याचा अर्थ नैसर्गिक स्रोत ओरबाडण्याचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात वाढले आहे. अशाच प्रकारे वाढ होत राहिली तर माणसाचे नैसर्गिक संरक्षण कवच असलेले पर्यावरण अत्यंत दुर्बल बनेल, हे स्पष्ट आहे. या अहवालात जागतिक लोकसंख्येची विविध स्रोतांची मागणी सहन करणे पृथ्वीच्या कसे आवाक्याबाहेर चालले आहे, तेही स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या 80 टक्क्यांहून अधिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता तलावांमध्ये, झर्‍यांमध्ये आणि महासागरांमध्ये सोडले जात आहे. त्याबरोबरच सुमारे 300 ते 400 दशलक्ष टन जड धातू, विषारी रसायने आणि इतर औद्योगिक टाकाऊ पदार्थ पाण्यात सोडले जात आहेत. प्लॅस्टिकचा कचरा प्रचंड प्रमाणात वाढला आहे. 1980 पासून तो दहा पटींनी वाढला आहे. त्यामुळे 86 टक्के सागरी कासवं, 44 टक्के समुद्री पक्षी आणि 43 टक्के सागरी सस्तन प्राण्यांवर विपरीत परिणाम झाले आहेत. पाण्यात सोडण्यात आलेल्या खतांमुळे 400 मृतवत विभाग तयार झाले आहेत. त्यांचा आकार जवळजवळ युनायटेड किंग्डमएवढा आहे. या भीषण परिस्थितीमुळे पर्यावरणतज्ञ हवालदिल झाले असून राजकीय इच्छाशक्ती प्रबळ न झाल्यास मानवी जातीच्या कल्याणाची आशा सोडून द्यावी लागेल, असा निर्वाणीचा इशारा
त्यांनी दिला आहे.
– मधुरा कुलकर्णी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!