संस्थान प्रशासन व शिर्डी ग्रामस्थांमध्ये विसंवाद

0

आज ग्रामसभा ः साई समाधी सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर संघर्षाची बीजे रोवण्याची शक्यता

 

शिर्डी (प्रतिनिधी) – साईबाबा संस्थान आणि शिर्डीतील ग्रामस्थ यांच्यातील विसंवाद दिवसेंदिवस वाढतच चालला असून त्यातून संस्थान विश्‍वस्त, प्रशासनाविरोधात शिर्डी ग्रामस्थांमध्ये असलेला असंतोष खदखदून आला आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी सायंकाळी 6 वाजता शिर्डी ग्रामस्थांनी ग्रामसभा आयोजीत केली आहे. या ग्रामसभेत साई संस्थान विश्‍वस्त, संस्थान प्रशासन यांच्या विरोधात शिर्डी ग्रामस्थ संघर्षाची भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याने शिर्डी ग्रामस्थ व संस्थान प्रशासन व विश्‍वस्तांच्या विरोधात संघर्षाची बीजे रोवली जाण्याची शक्यता आहे.

 

 

साईबाबा संस्थान विश्‍वस्त मंडळाने एक वर्षाच्या काळात केवळ घोषणाबाजी करून साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांची दिशाभूल केली असल्याचा आरोप शिर्डी ग्रामस्थांचा असून साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याला आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिला असूनही संस्थान विश्‍वस्त व प्रशासन काही निर्णय घ्यायला तयार नाही. केवळ कागदाचा खेळ करून विश्‍वस्त मंडळ धूळफेक करीत आहे. असा आरोप विश्‍वस्त मंडळावर ग्रामस्थांनी केला. समाधी शताब्दी सोहळ्याचे नियोजन संस्थानने काय केले याचा खुलासाही संस्थान अद्यापपर्यंत करू शकले नाही. त्यामुळे शिर्डी ग्रामस्थांमध्ये असंतोष उफाळून आला आहे.

 

डॉ. सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन विश्‍वस्त मंडळ साईसंस्थानवर नेमले. मात्र वर्षाचा कालावधी लोटूनही फक्त घोषणाबाजी करण्यातच या विश्‍वस्त मंडळाचा वेळ गेला आहे. साईबाबा समाधी शताब्दी सोहळा तोंडावर आला असतानाही विश्‍वस्त मंडळ हलायला तयार नाही. ग्रामस्थांनी संस्थान प्रशासन व विश्‍वस्तांना वेळोवेळी भेटून निवेदने देऊन साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचे जागतीक पातळीवर नियोजन करून भाविकांसाठी शहरात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची मागणी अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही.

 

 

आता अवघ्या 90 दिवसांवर साईसमाधी शताब्दी सोहळा येऊन ठेपला असतानाही विश्‍वस्त व प्रशासन काही करायला तयार नाही. संस्थान काय कामे करणार याचा खुलासाही करायला तयार नसल्याने शिर्डी ग्रामस्थांमध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.

 

 

समाधी शताब्दी वर्षाची प्रसिध्दी करण्यासाठी सुपर स्टार अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर यांच्यासह विविध राज्यातील कलाकारांना नेमण्याची शिर्डी ग्रामस्थांची मागणी आहे. समाधी शताब्दी वर्षात करोडो साईभक्त शिर्डीत येणार असल्याने नाशिकच्या कुंभमेळ्याच्या धर्तीवर भाविकांसाठी दर्शनबारी, पायाभूत सुविधा आतापर्यंत निर्माण होणे गरजेचे होते. पण अद्यापपर्यंत या कामाला मुहूर्तच लागलेला नाही. शिर्डीत साईभक्तांसाठी दोन्ही बाजूंनी भव्य व ऐतिहासीक स्वागत कमानी, चौकांचे सुशोभीकरण, प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे, हॉस्पिटलसाठी तज्ञ डॉक्टरांच्या नेमणुका, रस्त्यांची निर्मिती, विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय, लेझर शो प्रकल्प, गार्डन आदी प्रकल्प पूर्ण करण्याची शिर्डी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झालेली नाही.

LEAVE A REPLY

*