Type to search

नाशिक

संस्कारभारती साहित्यकट्टयात रंगला ब्लॉगर्सचा कट्टा

Share

आजच युग हे तंत्राज्ञानाचं युग आहे, परंतु आजही ब्लॉग किंवा ब्लॉगिंग म्हणजे काय आहे. हे बहुतेक जणांना माहिती नाही. ब्लॉगविषयी लोकांमध्ये जागरूकता आणि उत्सुकता निर्माण व्हावी यासाठी संस्कारभारती साहित्यकट्टयाच्या वतीने मंगळवारी (दि.४ जून) ‘ब्लॉग – एक साहित्यप्रकार’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

शंकराचार्य संकुलातील ढोबळे सभागृहात हे चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात ब्लॉगर सौरभ रत्नपारखी, ब्लॉगर कुंतक गायधनी, ब्लॉगर तन्वी अमित आणि ब्लॉगर सोनाली तेलंग यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शैलेश माळोदे हे उपस्थित होते.

हल्ली मोबाइलचा वापर खूप वाढला आहे. ई- बुक्स, फेसबुक, ब्लॉग यामुळे हातात वाचनालय सुरू झाले आहे. प्रत्येक जण सोशल मीडियावर व्यक्त होतो. साहित्य, नाटकाची समीक्षा केली जाते त्याचप्रमाणे ब्लॉगच्या साहित्याची देखील समीक्षा केली जावी, असे प्रतिपादन सौरभ रत्नपारखी यांनी केले.

ब्लॉगवर व्हिडिओ,ऑडिओ, फोटो, लेखन या माध्यमातून आपलं म्हणणं सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे ब्लॉग हे माध्यम सर्व माध्यमांना बांधून ठेवणारं आहे, असे मत तरुण पिढीतले ब्लॉगर कुंतक गायधनी यांनी व्यक्त केले.

१० वर्ष ब्लॉगच्या क्षेत्रात लिहीत असताना आलेले अनुभव, परदेशातून आलेल्या प्रतिक्रिया तन्वी अमित यांनी सांगितल्या. तसेच ब्लॉगवर लिहिताना सामाजिक भान प्रत्येकाने बाळगले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

ब्लॉगला विषयाची आणि शब्दांची मर्यादा नसते. आपले विचार समर्पक शब्दातून आपण ब्लॉगवर लिहू शकतो. तरुण पिढीने ब्लॉगकडे वळायला हवे, असे मत सोनाली तेलंग यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यविधा प्रमुख नीता देशकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा सावजी आणि बागेश्री पारनेरकर यांनी केले. कार्यक्रमाला संस्कारभारती अध्यक्षा स्वाती राजवाडे, साहित्यविधा प्रमुख नीता देशकर, रविंद्र बेडेकर, मेघना बेडेकर, प्रशांत कुलकर्णी, प्राची कुलकर्णी, दिलीप कुलकर्णी, संस्कारभारतीचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चर्चासत्रातून झाले ब्लॉगविषयी शंकांचे निरसन 

ब्लॉग या माध्यमाविषयी अनेकांच्या मनात संभ्रम असतात. ब्लॉग ओपन कसा करायचा, तो वापरायचा कसा, विषय कसा निवडायचा, अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा रसिकांच्या अशा अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे ब्लॉगर्सनी दिली. चर्चासत्राच्या समारोपात शैलेश माळोदे यांनी मार्गदर्शन केले.*

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!