Type to search

ब्लॉग

संवाद हाच उत्तम मार्ग

Share

वयात येणार्‍या मुलांना काहीतरी वेगळे वाटत असते. कोणाशी बोलावे तेही कळत नसते. संकोच आणि सगळाच गोंधळ असतो. या अडनिड्या वयात काय गंमत असते ते आपण समजून घेणार आहोत या लेखमालेत..

राज हा अभ्यासात हुशार, खेळात रमणारा शालेय विद्यार्थी. त्याच्या आजूबाजूचे वयात येणारे त्याचे मित्र त्या वयात नैसर्गिक अशा गोष्टी करत होते. म्हणजेच बर्‍याचशा मुलांकडे अ‍ॅण्ड्रॉईड फोन होते, त्यावर न्यूड फोटोज, पॉर्न साईटस् बघणे, ते एकमेकांना दाखवून त्यावर चर्चा करणे, जोक्स करणे.

राजला मात्र या गोष्टी करण्यात रस नव्हता. त्याला वाटायचे या सर्व गोष्टी त्याच्या अभ्यासामध्ये बाधक होतील. त्यामुळे तो हेतूपुरस्कर या गोष्टी बघणे टाळायचा. पण आणखीन एक-दोन वर्षांनी जसजसे वय वाढत गेले तसे आपण कितीही उर्मी दाबून ठेवली तरी निसर्ग थांबत नसतो याची प्रचिती त्याला आली. एक दिवशी त्याने इंटरनेटवर काही साईटस् बघून हस्तमैथुन केले. पण आई-वडील घरी आल्यानंतर मात्र तो खूप भेदरला होता. त्याला अपराधी वाटत होते. त्याने आई-बाबांना विश्वासात घेऊन सारे सांगितले. आई-बाबांनी त्याला प्रथम शांत केले आणि समजून सांगितले की हा निसर्ग आहे. यामध्ये तू काही चुकीचे कृत्य केले नाही. त्यानंतर राजने त्यांना सांगितले की, मध्यंतरी त्याच्या एका कोर्सच्या सरांनी ज्या ज्या मुलांनी अशा साईटस् बघितल्या आहेत त्यांनी साष्टांग दंडवत घालून माफी मागा, असे सांगितले होते. तेव्हापासून राजच्या मनात असे काही करणे म्हणजे पाप आहे, असे घर करून बसले होते. त्यामुळे तो या गोष्टींपासून लांब राहत होता. परंतु नैसर्गिकरीत्या बादली भरली तर ते पाणी वाहूनच जाणार. जरी त्याने हस्तमैथुन केले नसते तरी एखाद्यावेळेस ते रात्री झोपेत सख्खलन झाले असतेच.

या प्रसंगानंतर राजच्या आई-बाबांनी त्याच्या मोठ्या भाऊ-बहिणींना घरी बोलावले. ताई आणि दादांनी ते या वयात असताना त्यांची झालेली मानसिक उलघाल, मित्रांकडून कशी या गोष्टींची माहिती मिळाली, कोणाला सांगू शकत नव्हतो अशाप्रकारचे अनुभव शेअर केले. या सर्व गप्पांमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली. हस्तमैथुन करणे ही एकांतात करण्याची गोष्ट आहे. याचे प्रमाण इतकेही वाढायला नको की ज्यामुळे तुमचे रोजचे काम, अभ्यास, खेळ याकडे दुर्लक्ष होईल. म्हणजेच चोवीस तास फक्त याच गोष्टींचा विचार करणे, पॉर्न साईटस् बघण्याच्या आहारी जाणे हे होता कामा नये वगैरे समजावून सांगितले. गप्पांमध्ये एका दादाने त्याचा अनुभव शेअर केला. तो राजच्या वयात असताना एकदा मोबाईलवर त्याने पॉर्न साईटस् बघितल्या होत्या. तेव्हा त्याचे वडील खूप रागावले होते. हे करणे चुकीचे आहे, तुला याची माहिती कुठून मिळाली, असा प्रश्नही विचारला. त्याने एका मित्राचे नाव सांगितले. तर त्याच्या आईने त्या मित्राच्या आईला फोन करून सांगितले की, तुमचा मुलगा आमच्या मुलाला अशी चुकीची माहिती देतो आहे. आमचा मुलगा असा नाहीये. इथून पुढे आमचा मुलगा तुमच्या मुलाशी दोस्ती करणार नाही. हे सर्व सांगितल्यावर तो दादा म्हणाला, माझ्या आई-बाबांना याविषयी असलेले अज्ञान आणि याविषयी आपल्या मुलांशी कसे बोलायचे याचा संकोच, यामुळे मी माझा एक चांगला मित्र कायमचा गमावला.

हस्तमैथुन ही क्रिया जशी मुलांच्या बाबतीत नैसर्गिक आहे तशीच ती मुलींच्या बाबतीतही तितकीच नैसर्गिक आहे. वयात येणार्‍या मुला-मुलींशी याविषयी आई-वडिलांनी मोकळेपणाने बोलले पाहिजे, त्यांचे शंका निरसन केले पाहिजे. तुम्हाला बोलायला संकोच वाटत असेल तर एखाद्या तज्ञ व्यक्तीशी त्यांना संवाद साधू द्यायला हवा. या वयात येताना घडणार्‍या गोष्टींचे परिणाम, मुले मोठे झाल्यावर त्याचे पडसाद त्यांच्या आयुष्यात उमटत असतात.
meghamanohar1971@gmail.com
– मेघा मनोहर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!