संवाद : आयुक्त दिलीप गावडे : नगरच्या राजकारण्यांना कळतं पण वळत नाही!

0

आयुक्त दिलीप गावडे यांनी घातलं अंजन

सत्ताधारी-विरोधकांत समन्वयाचा अभाव

 • बजेटमध्ये हेडवाईज उल्लेख नसल्याने कामाचे राजकारण होते.
 • नगरमध्ये खूप मानसिक त्रास झाला.
 • कायद्याच्या चौकटीत राहून काम केले.
 • सल्ला देण्याइतपत मोठा नाही.
 • शहरासाठी होईल तितके केले.

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेत सत्ताधारी-विरोधक-प्रशासन यांनी हातात हात घालून समन्वयाने काम केले तर शहर विकासाचा गाडा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. मात्र, इथे कोणात समन्वय दिसत नाही. समन्वयाचा मध्यबिंदू साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. होता होईल तितके सकारात्मक काम केले, अशी प्रांजळ कबुली देत महापालिकेचे मावळते आयुक्त दिलीप गावडे यांनी नगरच्या राजकारण्यांना कळतं पण वळत नाही, असं निरीक्षण नोंदवित नगरचं विश्‍लेषण केलं. खरं तर सल्ला देण्याइतका मी मोठा नाही असंही ते नगर टाइम्सशी बोलताना म्हणाले.
नाशिक येथील आदिवासी विभागात संचालक म्हणून दिलीप गावडे यांची बदली झाली आहे. गावडे याची नगरमधील कारकीर्द प्रचंड वादळी ठरली. त्याबाबत तसेच महापालिकेतील राजकारणासंदर्भात त्यांचे मत नगर टाइम्सने जाणून घेतले. सुरूवातीला त्यांनी मत व्यक्त करण्यास नकार दिला, नंतर बिनधास्तपणे मत नोंदवलं. त्यांचं निरीक्षण नगरच्या राजकीय मंडळीच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे.

 • नगरपालिकेची महापालिका झाली तरी शहर विकास झाल्याचे दिसत नाही?
  – या प्रश्नावर आयुक्त गावडे यांनी थेटपणे उत्तर देणे टाळले पण त्यावर मार्मिक भाष्य करीत ते म्हणाले, शहराचा विकास करण्याची जबाबदारी एकट्या सत्ताधार्‍यांची नाही. विरोधक-प्रशासनाची त्याला साथ पाहिजे. तिन्ही यंत्रणेने समन्वय साधून काम केले तर विकासाचा आलेख उंचावेल. मात्र नगरमध्ये अशा समन्वयाचा अभाव आहे. पक्षीय राजकारणामुळे गरजेचे प्रश्नाला बगल दिली जाते. जिरवाजिरवीच्या राजकारणामुळे हे घडतं. प्रशासनाने मध्यबिंदू साधण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. सत्ताधार्‍यांसोबतच विरोधकांचेही मलाच ऐकून घ्यावे लागले.
 • समन्वयासाठी प्रशासनाने काय प्रयत्न केले?
  – सुरूवातीचा काळ शहर व महापालिका समजण्यात गेला. नंतर सत्ताधारी-विरोधकांतील विसंवाद असल्याचे दिसून आले. दोघांमध्ये समन्वयाचा केंद्रबिंदू साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. विकासाच्या प्रश्नावर सत्ताधारी- विरोधकांनी (मग ते कोणत्याही पक्षाचे असो) एक झाले पाहिजे. विकासकामात राजकारण नको. तरच शहर विकासाचा आलेख उंचावेल.
 • बजेटचा आकडा तर 500 कोटी पार करतो, मग तो खर्च होतो तरी कोठे?
  – बजेट फुगीर असल्याची जाणीव झाल्याने त्यातील अनावश्यक बाबी टाळण्याचा प्रयत्न केला. वसुली व जमा या नेमक्या आकड्याची मांडणी करून बजेट मांडले. पुणे, नाशिकसारख्या मोठ्या महापालिकेत बजेटमध्ये विकास कामे व त्यासाठी निधीची तरतूद केली जाते. नगरमध्ये मात्र तसे होत नाही. बजेटमध्ये विकासकामाच्या हेडवाईज निधी नसल्याने तो खर्च करण्यावरून नंतर राजकारण होते. ज्या कामावर खर्च होणार आहे, त्या कामाचा उल्लेख करून बजेटमध्ये तरतूद व्हायला पाहिजे.
 • नगरमधील कार्यकाळ कसा वाटला?
  – सव्वा वर्षाच्या कार्यकाळात खूप काही सहन केले. विरोधकांची ‘फवारणी’ अन् त्यावरून सत्ताधार्‍यांचे ‘ते अंगावर चढले’ हे विनाकारण ऐकून घ्यावे लागले. काम करताना खूप मानसिक त्रास झाला. मात्र होईल तितके करण्याचा प्रयत्न केला. अहमदनगर महापालिकेचा अनुभव माझ्यासाठी निश्चितच चांगला नव्हता.
  प्रशासकीय प्रमुख म्हणून काय सांगाल?
 • – सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात प्रशासन कात्रीत सापडते. यांचे ऐकावे की त्यांचे असा प्रश्न उभा राहतो. पण कायद्याच्या चौकटीत जे बसते तेच करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. सर्वांनाच न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
 • नगरच्या राजकारण्यांना काय सल्ला द्याल?
  – खासदार, आमदार, माजी आमदार यांच्या टर्म पाहता सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही. त्यांना सगळं काही कळतं. ते समजून घेतील अन् त्यात सुधारणा करतील हीच अपेक्षा. बाकी मी काही बोलू शकत नाही.

LEAVE A REPLY

*