संरक्षक भिंतीवर कार धडकली

0

नवीन नाशिक /इंदिरानगर | दि. १२ प्रतिनिधी- येथील वडाळा-नाशिकरोड मार्गावर भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यालगतच्या ओजस ऍव्हेन्यू या इमारतीच्या संरक्षक भिंतीवर धडकली. यात इमारतीची सुरक्षा भिंत कोसळली असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांनी केली असून अद्याप त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचे इमारतीतील रहिवाशांनी सांगितले. अपघाताच्या आवाजाने नागरिक घटनास्थळी गोळा झाले.

कारमधील युवकांपैकी कोणालाही दुखापत झाली नसून कारची एअरबॅग उघडल्यानेच हे तरुण बचावल्याचे नागरिकांनी सांगितले. शेवरोले कंपनीची एमएच ४३ बी ५२९९ ही कार आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही येथे अशा स्वरुपाचे अपघात घडले आहेत. भविष्यात अपघातामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी येथे गतिरोधक बसवावेत, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

महिला समुपदेशकास कोठडी
समुपदेशक महिलेने मुलांच्या पालकांकडून हजारो रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी संशयित शीतल कोलगे यांच्यावर मुंबईनाका पोलीस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कोलगे यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मुंबईनाका पोलीस ठाण्यात शालू अविना सेठी (३०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑगस्ट २०१६ पासून संशयित शीतल राहुल कोलगे या

अशोका युनिव्हर्सल शाळेत समुपदेशक पदावर काम करीत होत्या. त्यांनी पदाचा गैरवापर करून अशोका स्कूलच्या कॅम्पसमधील कॅबिनमध्ये ६२ हजार ३०० रुपये वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या तारखांना घेतले. या पैशांंची कोणत्याही स्वरुपाची पावती न देता हे पैसे अशोका स्कूलसाठी घेतल्याचे भासवले व शाळेचीही फसवणूक केली असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भाभानगरमध्ये घरफोडी
बनवाट चावीने दरवाजाचे कुलूप उघडून ४८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरल्याची फिर्याद मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार कौटघाट रोड, भाभानगर परिसरातील रहिवासी संध्या नवनाथ पवार या दुपारी बाहेर गेल्या असल्याची संधी साधत बनावट चावीने घर उघडून ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ३ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

इंदिरानगरला कार चोरी
पहाटेच्या सुमारास योग प्रशिक्षणासाठी गेलेल्या इदनानी परिवाराची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पाथर्डी रस्त्यावर घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवन केवलराम इदनानी (७२, रा. मातृछाया, शिव कॉलनी, वडाळा-पाथर्डी रोड, नाशिक) हे शनिवारी पहाटे आपल्या कुटुंबियांसह सुदर्शन लॉन्स परिसरातील योग प्रशिक्षण क्लासला गेले असताना लॉन्ससमोर उभी केलेली त्यांची इंडिगो क्वॉलिस एमएच ०९ बीबी ३२०५ ही कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. इदनानी यांच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

*