संपाची धग कायम

0

नगर तहसीलसमोर भजन / सरकारी कार्यालयांना पोलीस बंदोबस्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – संपूर्ण कर्जमाफीसह हमीभाव आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी 1 जूनपासून शेतकर्‍यांनी पुकारलेला संप सहाव्या दिवशीही सुरूच आहे. पाच दिवसांनंतरही या संपावर तोडगा निघू शकलेला नाही. विविध शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी नगर तहसील कार्यालसमोर भजन आंदोलन केले. पोलीस बंदोबस्तामुळे आंदोलकांना तहसील कार्यालयास टाळे ठोकण्यात अपयश आले.मात्र तहसीलदारांना आंदोलकांनी कुलूप भेट दिले. सावेडी तहसील कार्यालय पोलीस बंदोबस्तात आजपासून सुरू झाले. पुणतांबा येथे सरकारचा दशक्रियाविधी करत शेतकर्‍यांनी निषेध व्यक्त केला.

मंगळवारी आंदोलनाच्या पुढील टप्प्यात शासकीय कार्यालयाला कुलूप ठोकण्याची हाक शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आली होती. त्यापार्श्‍वभूमीवर नगर तहसिल कार्यालय येथे शेतकरी संघटना आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार सुधीर पाटील यांना कुलूप व निवेदन दिले. त्यानंतर हभप अजय महाराज बारस्कार, बच्चू मोडवे, भैरवनाथ वाकळे, रामदास काकडे, दिंगबर भोसले यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात भजन-किर्तनास सुरूवात केली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून सहाय्यक पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तहसील कार्यालय येथे तैनात करण्यात आला होता.
जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प असल्याने जिल्हा बाजारपेठेत शेतमालाची आवक घटल्याने भाज्या आणि  फळांचे दर महागली आहेत. नगरच्या बाजारपेठेत भाज्यांची आवक घटल्याने भाज्या महागल्या आहेत. सावेडी, नालेगाव, केडगाव, भिंगार परिसरात भरणार्‍या भाजी बाजारात ठराविक विक्रेते भाजी विक्री करत असल्याचे दिसून आले.
संप काळात शेतकरी आक्रमक झाला असून ठिकठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमांचे दहन करण्यात आले. रेलेरोको, रास्तारोको, भाजीपाल्याची वाहने, दूधाचे टॅँकर अडवण्याचे आंदोलन नगरसह राज्यभर सुरू आहे. काही ठिकाणी रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळित झाली. दरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या रास्तारोको आंदोलनामुळे विभागीय नियंत्रकांनी ग्रामीण भागातील 288 एसटीच्या फेर्‍या रद्द केल्या आहेत.

पोलिसांनी अजय महाराज बारस्कर यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी तहसील कार्यालयास कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने आंदोलनकर्त्यांचा डाव फसला. भजन आणि कीर्तन झाल्यावर आंदोलनकर्ते या ठिकाणीहून निघून गेले. शहरातील अन्य शासकीय कार्यालयाकडे आंदोलनकर्त्यांनी पाठ फिरवली.

LEAVE A REPLY

*