संगमनेर तालुक्यात शेतकर्‍यांचे आंदोलन सुरूच!

0

निमगावपागा ः आठवडे बाजार बंद, पुतळ्याचे दहन, निमगावजाळी ः दूध रस्त्यावर ओतले

 

संगमनेर (प्रतिनिधी) – शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेला शेतकरी संप अद्यापही सुरूच आहे. तालुक्यात सर्वत्र दूध संकलन केंद्र बंद ठेवण्यात आली आहे तर शेतकर्‍यांनी भाजीपाला, दूध रस्त्यावर टाकून सरकारविषयी संतप्त भावना व्यक्त केल्या आहे.

 

निमगावजाळी येथे रस्त्यावर दूध ओतून देण्यात आले तर वडगावपान येथे दुधाच्या गाड्या अडविल्या. आंबीफाटा येथे आंदोलनकर्त्यांनी टोमॅटोच्या जाळ्याच रस्त्यावर ओतून दिल्या. ओझर येथे दूध संकलन रोखण्यात आले. तर निमगावपागा येथे फडणवीस सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

 
निमगावपागा येथे प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन
निमगावपागा प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील निमगावपागा येथे रविवारी शेतकर्‍यांच्यावतीने बंद पुकारण्यात आला असून पंचायत समितीचे माजी सदस्य नानासाहेब कानवडे यांच्या मार्गदर्शनखाली राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे चौकात दहन करण्यात येऊन सरकारविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

 

 
फडणवीस सरकार हे शेतकर्‍यांची फसवणूक करत असून शेतकर्‍यांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांच्या संपूर्ण मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत हा संप चालूच राहील, असा एकजुटीने निर्णय घेण्यात आला. शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाची शिफारस, शेतीला हमी भाव, वीज बिल संपूर्ण माफ करा, या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोपर्यंत शेतकर्‍यांचा लढा सुरुच राहणार असल्याचे नानासाहेब कानवडे यांनी म्हटले.

 

 
यावेळी सरपंच सीमा भिसे, उपसरपंच बाळासाहेब कानवडे, बंडू कानवडे, माधव कानवडे, संजय कानवडे, रावसाहेब डुबे यांच्यासह शेतकरी, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला तर व्यापार्‍यांनी आपापले व्यवहार बंद ठेवत सरकारचा निषेध नोंदविला.

 

 
निमगावजाळी येथे शेतकरी रस्त्यावर
निमगावजाळी प्रतिनिधी दिलेल्या माहितीनुसार येथे शेतकर्‍यांनी रस्त्यावरील वाहने अडवून ठिकठिकाणी दूध ओतून सरकारचा निषेध केला. शेतकरी संप सुरूच राहणार असल्याचा ठाम निर्धारही यावेळी शेतकर्‍यांनी व्यक्त केला. कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील निमगावजाळी येथे काल रविवारी सकाळीच शेतकर्‍यांनी दुधाची वाहने अडविली. त्याचबरोबर परिसरातील शेतकर्‍यांनी आपापले कॅनमधील दूध रस्त्यावर ओतून दिले. शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी देखील शेतकर्‍यांनी संपाला तेवढाच प्रतिसाद दिला.

 

 

शेतकर्‍याला संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, या मागणीसह शासनाच्या कल्याणकारी योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचल्या पाहिजे. निमगावजाळी व परिसरातील दूध संस्थांनी दूध संकलन बंद केले. संतप्त शेतकर्‍यांनी टोमॅटो, कांदा, दूध रस्त्यावर फेकून देत सरकारचा निषेध नोंदविला. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून आश्‍वी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश कामाले, पोलीस उपनिरीक्षक भीमराज शिंदे व कर्मचार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

 

 

आंबी फाटा येथे रस्त्यावर ओतला भाजीपाला
पुणे-नाशिक महामार्गावरील आंबी फाटा येथे शेतकर्‍यांनी 1 जूनपासून आंदोलन सुरु केले आहे. राज्य सरकारने अद्यापही दखल घेतली नसल्याने शेतकर्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. काल रविवारी संतप्त शेतकर्‍यांनी महामार्गावर टोमॅटो, कांदा, भाजीपाला फेकून तीव्र निषेध व्यक्त केला.

 

 
यावेळी शेतकर्‍यांनी शेतातील कांद्याची आरण ते पुणे-नाशिक महामार्गापर्यंत राज्य सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध व्यक्त केला. काल आंबी खालसामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. आंदोलनात बाळू ढोले, सुरेश गाडेकर, दीपक ढमढेरे, अरुण कान्होरे, राहुल कान्होरे, किरण भोर, नितीन काशिद, राजू जाधव, रामप्रसाद चांदघोडे, वसीम सय्यद, बजरंग तांगडकर, रवींद्र काशिद आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

 

 

 

LEAVE A REPLY

*