संगमनेरात हापूस लुटला!

0
संगमनेर (प्रतिनिधी)- फळांचा राजा रत्नागिरी हापूस सध्या भाव खातो आहे. एक किलोला 250 रुपये मोजावे लागत असतांना आज गुरुवारी सकाळी 9 वाजता पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सुमारे तीन लाखाचा रत्नागिरी हापूस घेऊन जाणारी पिकअप जीप उलटली. जीपमधील जखमींना मदत करण्याचे सोडून स्थानिकांसह जाणार्‍या येणार्‍यांनी रत्नागिरी हापूस लांबविण्यातच धन्यता मानली.
रत्नागिरी हून नाशिककडे पिकअप जीप क्रमांक एम. एच. 08 डब्ल्यू 3098 हा पुणे-नाशिक महामार्गाहून जात असतांना बोटा शिवारात विद्यानिकेतन कॉलेजसमोर समोरील एका वाहनाने ब्रेक दाबला त्यामुळे पिक अप जीप चालकाने देखील ब्रेक दाबला मात्र वेग पिक अप जीपचा वेग जास्त असल्याने तो उलटला. जशी पिकअप जीप उलटली तसे आंब्याच्या लाकडी पेट्या जीपबाहेर फेकल्या गेल्या. जाणार्‍या-येणार्‍यांना रत्नागिरी हापूस आंब्याचे दर्शन होताच प्रत्येक जण त्यावर तुटून पडला. रस्त्यावर सर्वत्र आंबा पडलेला होता तर जाणारे-येणारे थांबून आंबा गोळा करत होते. तर काही लोकांनी आंब्यावर यथेच्छा ताव मारला.

 जीपमधील दोघे किरकोळ जखमी झाले होते. मात्र त्यांना दवाखान्यात नेण्याकरीता देखील कुणाकडे वेळ नव्हता. प्रत्येकजण आंबा पळविण्याच्या मागे लागला होता. अनेकांनी आंब्याच्या पेट्या लांबविल्या. घटना घडल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात जीपमधील सुमारे तीन लाखाचा आंबा गायब झाला. 

LEAVE A REPLY

*