संगमनेरात गंठणचोरांची पोलीस अधीक्षकांना सलामी

0

पोलिसांच्या डोळ्यादेखत घडल्या घटना

 

संगमनेर (प्रतिनिधी)- गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून धूमस्टाईलने महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लांबविण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. या घटनांपासून संगमनेर देखील सुटलेले नाही. संगमनेरात खुद्द जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा असताना त्याचवेळी गंठणचोरीच्या घटना घडल्याने पोलीस खात्याची इज्जत चव्हाट्यावर आली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची भाषा करणार्‍या पोलिसांपुढे चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.

 
संगमनेरात काल शुक्रवारी जाणता राजा रोड, साईश्रद्धा चौक, बसस्थानक येथे पोलिसांदेखत गंठणचोरीच्या घटना घडल्याने गुन्हेगारीने कळसच गाठल्याचे चित्र संगमनेरात दिसून येत आहे. दारू, जुगार, मटका या अवैध धंद्यांसह दारुबंदी असतानाही बेकायदेशिररित्या दारुविक्री जोरात सुरू आहे. अवैध धंद्यांची बोंब जेव्हा झाली तेव्हा शहर पोलिसांनी गुरुवारी ठिकठिकाणी छापे टाकून कारवाया केल्या.

 
शहरातील गोल्डनसिटी येथे राहत असलेल्या दीपाली गजानन खाडे या नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या दुचाकीवरून कामावर जात असताना जाणता राजा रोड येथे दोघे जण पल्सर मोटारसायकलहून आले व त्यांनी सदर महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे गंठण धूमस्टाईलने लांबविले. 62 हजार 500 रुपयांचे हे गंठण होते. सदर महिलेने आरडाओरड केला मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

 

सदर घटनेची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात देण्यासाठी येत असताना साईश्रद्धा चौकात भारती बाळासाहेब गायकवाड या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत दीपाली खाडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माळवदे करत आहे.

 
तसेच दुपारी 1 वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस प्रमुख संगमनेरात येणार असल्याने बस स्थानक चौकात पोलीस बंदोबस्त होता. त्या दरम्यान संगमनेरात औषधोपचारासाठी आलेले निसार मकबुल सय्यद (रा. राहुरी) हे बसस्थानकावर नासिक-सोलापूर बसमध्ये बसत असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन सुमारे 75 हजार रुपये किंमतीची चोरट्यांनी लांबविली. याबाबत निसार सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बनसोडे करत आहेत.

 

 काल शुक्रवारी जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा हे नाशिकला जात असताना संगमनेरात थांबणार होते. त्यामुळे शहर पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात केले. पोलीस अधीक्षक शासकीय विश्रामगृहावर येऊन थांबले. तर दुसरीकडे गंठणचोर सुसाट सुटले. एकापाठोपाठ एक चार ठिकाणी धूमस्टाईलने महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. जिल्हा पोलीस प्रमुख संगमनेरात दाखल होत नाहीत तोच त्यांना गंठणचोरांचा संगमनेरात किती सुळसुळाट आहे याची कल्पना आली. जणू काही गंठणचोरांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना सलामीच दिली.

LEAVE A REPLY

*