संगणकीकृत सातबारा उतार्‍यांची अचूक पडताळणी करावी !

0
नंदुरबार / देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिक कार्यक्रम अर्थात 7/12 संगणकीकरण कार्यक्रमात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत म्हणून प्रत्येक घरापर्यंत जात 7/12 संगणकीकरण पडताळणी करुन अचूक नोंदी घ्याव्यात, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.
अवघे-जुनवणे, तालुका शहादा येथे पालकमंत्री श्री.रावल यांच्या उपस्थितीत चावडी वाचनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री श्री.रावल म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डिजिटल भारतासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत.

सातबारा उतारा घेण्यासाठी आता नागरिकांना अधिकारी, कर्मचार्‍यांच्या मागे फिरावे लागणार नाही. डिजिटल क्रांतीमुळे दाखले मिळणे आता सहज व सोपे होणार आहे.

लवकरच ऑनलाइन सातबारा उतारा मिळणार आहे. त्याचाच एक भाग म्हणजे 7/12 संगणकीकरण होय.

चावडी वाचनाच्या माध्यमातून अचूक असे संगणकीकृत 7/12 उतारे केव्हाही, कुठेही आणि कधीही उपलब्ध होऊ शकतील.

नागरिकांनीही आपल्या 7/12 उतार्‍यांच्या नोंदी तपासून घ्याव्यात. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यात येत आहेत.

तळागाळातील घटकांच्या प्रगतीसाठी शासन कटीबध्द आहे. शेतकर्‍यांच्या प्रगतीसाठी गेल्या अडीच वर्षात 40 लाख कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे.

शेतकर्‍यांना पाणी, वीज आणि हमीभाव उपलब्ध करुन देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून 12 लाख 51 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

शेतकर्‍यांसाठी 11 हजार कोटींची मदत करण्यात आली आहे, तर पीक विम्याच्या माध्यमातून 6639 कोटींची मदत करण्यात आली आहे, असेही पालकमंत्री श्री.रावल यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*