Type to search

आरोग्यदूत

श्वास कोंडून ठेवणारे झटके

Share

श्वास कोंडून ठेवण्याच्या झटक्यांमुळे पालक अत्यंत चिंताग्रस्त बनतात. परंतु हे झटके धोकादायक नसतात. मूल घाबरले, निराश झाले किंवा त्याला इजा झाली तर ते येतात. आत्यंतिक रागातूनही हे झटके येतात.

सहसा बारा ते अठरा महिने वयाचे मूल कित्येक वेळा रडते, श्वास कोंडून ठेवते, निळे पडते, त्याची पाठ वाकडी होते आणि नंतर ते श्वास सोडून देते. काही वेळा ते फेफर्‍यासारखे आचके देते किंवा हात-पाय ताठरते. काही क्षणानंतर मूल पुन्हा मूळ पदावर येते. यावेळी ते क्षीण झाल्यासारखे वाटते. दमल्यासारखे दिसते आणि नंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे खेळू लागते.

हे झटके येण्याची वारंवारिता वेगवेगळी असू शकते. काही मुलांना दिवसातून अनेक वेला असे तीव्र झटके येतात. तर काही मुलांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा झटके येतात. असे झटके निरुपद्रवी असतात, हे पालकांनी समजून घेतले पाहिजेत. एक ते दोन वर्षात ते आपोआप थांबतात. बहुतेक मुलांमध्ये पाच वर्षांनंतर हे झटके आपोआप पूर्णपणे थांबतात.
फेफर्‍यापासून हे झटके वेगळे असतात. त्यांचा हा वेगळेपणा ओळखता आला पाहिजे. फेफर्‍यांमध्ये भावनिक घटकाचा मागमूसही नसतो. फेफरे येण्याआधी मूल सहसा रडत नाही. फेफरे येऊन गेल्यानंतर मूल बराच वेळ मंद, त्रासिक आणि निष्क्रिय बनून जाते. श्वास कोंडून ठेवणार्‍या मुलाचा इलेक्ट्रो-एनसिफॅमो- ग्राम निर्दोष असतो तर फेफरे येणार्‍या मुलात तो दोषयुक्त असतो.

श्वास कोंडून ठेवण्याच्या झटक्यांसाठी कोणत्याही प्रकारच्या औषधाची गरज नसते. मूल रागावले असेल किंवा अकारणच रडत असेल, तर त्याला एखाद्या खोलीत सोडून देणे उत्तम ठरते. या झटक्यांच्या विविध प्रकारे केल्या गेलेल्या अभ्यासावरून ही पद्धती अधिक प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे. हाताला हळुवारपणे चोळणे, पाठीवर हळवारपणे थोपटणे किंवा चेहर्‍यावर थोडेसे थंड पाणी मारणे उपयुक्त ठरते. रक्तक्षय असलेल्या मुलांमध्ये श्वास कोंडून ठेवण्याच्या झटक्यांची वारंवारिता अधिक असते. ते अधिक तीव्र स्वरुपाचे आणि अधिक काळ टिकणारे असतात. म्हणून अशा मुलांना लोहाच्या पूरक गोळ्या किंवा औषधे देणे उपयुक्त ठरते. पिरॅसेटममुळे असे झटके कमी येत असल्याचा दावा केला जात असला तरी ते खर्चिक असते आणि याच्या दैनंदिन वापराविषयीची शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही.
डॉ. योगिता पाटील

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!