श्रीरमपूरच्या स्टेट बँकेवर दरोड्याचा प्रयत्न

0

आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या एका आरोपीस न्यायाधिश एस. यु. बघेले यांनी दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारी वकील अ‍ॅड. प्रसन्न प्रभाकर गटणे यांनी काम पाहिले.

 

 

श्रीरामपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेवर 2 जुलै 2008 रोजी 12.30 वाजण्याच्या सुमारास काही लोक जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने स्टेट बँकेच्या परिसरात असल्याची माहिती तत्कालीन पोलीस निरीक्षक विजयकुमार पाटील यांना मिळताच त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद साळवे व पोलीस कॉन्स्टेबल अशोक गायकवाड यांच्यासह काही पोलिसांंना त्या ठिकाणी पाठविले.

 

 

 

त्यावेळी बँकेच्यासमोरच निलेश भालसिंग राठोड, जगदिश भानुदास राठोड, पुनमभाई राठोड, सुनील राठोड, किशोर बाबू मांचरेकर व गुरु राजू राठोड रा. कुबेरनगर अहमदाबाद यांना अटक केली. यातील एक आरोपी पसार झाला. या आरोपीची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे चॉपर, दोन सुरे, मिरची पावडर, तसेच काही रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. तसेच आरोपींनी वापरलेल्या मोटारसायकलीही जप्त केल्या. त्याप्रमाणे या सहा जणांविरुध्द गुन्हा रजि. नं. 112/2008 नुसार भादंवि कलम 399, 402 अन्वये तसेच आर्म अ‍ॅक्ट 4 (25) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक विजयकुमार पाटील यांनी या प्रकरणाचे चार्जशिट सेशन कोर्टात दाखल केले.

 

 

 

याप्रकरणाची सुनावणी न्यायाधिश एस. यु. बघेले यांच्यासमोर झाली. यातील आरोपी गुरु राजू राठोड यास न्यायालयाने जामीनही नाकारला होता. तसेच इतर आरोपी पसार झाल्याने सदर गुरु राजू राठोड याचेविरुध्द सदरचा खटला चालला. याप्रकरणी सरकार पक्षाच्यावतीने 8 साक्षीदार तपासण्यात आले. यात प्रसाद साळवे, अशोक गायकवाड, पिसाळकर, राख, दत्तु शिंदे व कुसाळकर, राजेंद्र चिंतामणीसह अन्य साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या.

 

 

 

आरोपींना घटनास्थळी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मिरची पावडर हस्तगत झालेली आहे. आरोपी हे दरोडा टाकण्याच्या उद्देशानेच त्या ठिकाणी आले होते असा युक्तीवाद सरकारी वकील अ‍ॅड. गटणे यांनी न्यायालयासमोर केला.

 

 

 

न्यायाधिश एस. यु. बघेले यांनी हा युक्तीवाद विचारात घेवून आरोपी गुरु राजू राठोड यास भादंवि कलम 399 अन्वये 10 वर्षे सक्तमजुरी 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 2 वर्षे कैदेची शिक्षा तसेच 402 अन्वये 7 वर्षे सक्तमजुरी, 5 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 वर्षे सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली. या सुनावणीप्रकरणी सरकारी वकील यानां पोलीस निरीक्षक संपत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अन्सार शेख, व कान्स्टेबल एकनाथ जाधव यांनी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

*