श्रीगोंद्यात विवाहितेवर सामूहिक अत्याचार

0
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज परिसरातील एका विवाहित महिलेवर सात जणांनी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून पाच जण पसार झाले आहेत.
पीडित विवाहितेच्या असाह्यतेचा फायदा घेत या सात जणातील एकाने दीड वर्षापासून मुलांना इजा पोहोचविण्याची धमकी देत वारंवार अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी इतर सहा जणांनी या पीडितेला ‘तुला आम्ही वारंवार पाहिले असून, याचा बोभाटा गावभर करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. सुमारे दीड वर्षापासून सातही जण पीडितेवर अत्याचार करीत होते.
या सातही जणांचा अत्याचार वाढल्याने ही घटना पीडितेने घरी सांगितली. त्यानंतर पीडितेला घेऊन तिच्या कुटुंबीयांनी श्रीगोंदा पोलीस ठाणे गाठून हा प्रकार कथन केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संभाजी विलास गवळी, दत्तात्रय रमेश शिंदे, भाऊसाहेब मारुती कुटे, दत्तात्रय बाळासाहेब पवार, धनंजय विठ्ठल पवार, विजय श्यामराव जगताप, विठ्ठल वामन भुजबळ (सर्व रा. अजनूज) यांच्यावर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संभाजी विलास गवळी व रमेश दत्तात्रय शिंदे या दोघांना अटक केली आहे. तर यातील अन्य पाच जण पसार झाले आहेत. अटक केलेल्या दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 16 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश मन्तोडे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*