शेवगाव तालुक्याच्या पूर्वभागात जोरदार पाऊस

0
शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – शेवगाव तालुक्याच्या पूर्वभागातील डोंगर पायथ्याशी असलेल्या राणेगाव-शिंगोरी परिसरात बुधवारी दुपारी जोराचा पाऊस झाल्याने नदीला पुर येवून बंधारे भरल्याने शेतकर्‍यामधून समाधान व्यक्त होत आहे.
याचप्रमाणे तालुक्यातील अमरापूर, फलकेवाडी, भगूर, आखेगाव या भागातही जोरदार पाऊस झाल्याने नंदिनी नदीला पूर येवून आखेगाव येथील दोन बंधारे भरले. पाथर्डी तालुक्यातीलही कासार पिंपळगाव, ढवळेवाडी, सुसरे आदी भागातही जोरदार पाऊस झाला. या समाधानकार पावसामुळे खरीपातील पिकांना जीवदान मिळाले आहे.
पावसाळा सुरु होऊन पावणे-दोन महिने लोटले तरी समाधानकारक पावसाने हजेरी न लावल्याने खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, तूर आदीपिकांसह फळबागा धोक्यात आल्या होत्या. शेतकर्‍यावर दुबार पेरणी संकट निार्माण झाले होते. त्यातच शेवगाव तालुक्याच्या काही भागात अल्पसा तर काही भागात जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.
बुधवारी अचानक आकाशात काळेकुट ढग जमा होऊन दुपारी दोनच्या सुमारास डोंगर पट्ट्यातील राणेगाव, शिंगोरी परिसरात जोरदारपणे पावसाच्या तासभर हजेरीमुळे काही वेळातच शेत जमिनीसह सर्वत्र पाणीचपाणी झाले. शेतातील उभी पिके पाण्यात गेली. छोटे-मोठे ओढे-नाले वाहू लागले. तलावात पाणीसाठा झाला आहे.
जोराच्या पावसामुळे शिंगोरी येथील बोधेगाव-पाथर्डी रोडवरील पूल पाण्याखाली जावून पाण्याच्या प्रवाहामुळे पूल तुटला गेल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. राणेगाव-शिंगोरी भागात जोरदार पावसामुळे भागातील ओढे नाले व नद्या तुटुंब वाहू लागले आहेत. पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत होणार असल्याची माहिती शेतकरी अंबादास वाघ यांनी दिली. पाठोपाठ बुधवारी कोनोशी, नागलवाडी, गोळेगाव, अधोडी भागात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली.

 

LEAVE A REPLY

*