शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

0

नांदूर शिकारी येथील घटना, सहकारी बँक व फायनान्स कंपन्यांचे घेतले होते कर्ज

 

तेलकुडगाव (वार्ताहर) – नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी येथील जाकीर शब्बीर शेख (वय-32) या तरुण शेतकर्‍याने सहकारी बँक व फायनान्स कंपनीच्या तगाद्याने घरासमोरील चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी येथील जाकीर शब्बीर शेख या शेतकर्‍याला पाच एकर जमीन आहे. यामध्ये एक एकर ऊस, अर्धा एकर भुईमूग तर काही शेती पडीक आहे. सलग तीन-चार वर्षे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेती तोट्यात जाऊन गावातील सेवा सोसायटी व फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? शेतात असलेले पीक करपून जळू लागल्याने आणखी कर्जबाजारी होण्याची भीती वाटू लागली. मग दोन मुलींचे लग्न, शिक्षणचा खर्च असे अनेक प्रश्‍न त्यांना सतावत असल्यानेे त्यांनी घरच्यांना आत्महत्या करावी वाटत असल्याचे वेळोवेळी बोलून दाखवल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.
शेख यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजयी, पुतणे असा मोठा परिवार आहे. पहाटे चार वाजेच्या वेळेस घरच्यांनी पाहिल्यावर आरडाओरडा करून शेजार्‍यांना बोलावले. मृतदेह खाली घेऊन नेवासाफाटा येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

 

त्यानंतर मृतदेह घरी आणून शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात कादीर शेख यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र भाग्यवान, अमोल अजबे, संग्राम जाधव करीत आहेत.

 

दोनतीन दिवसांपूर्वी एका बँकेत केला होता भरणा
जाकीर शेख यांनी दोनतीन दिवसांपूर्वी कुकाण्यातील एका बँकेत 20 ते 30 हजार रुपयांचा भरणा केल्याची चर्चा आहे. हे फायनान्स कोणते? अशी चर्चा सुरू असून सध्या ग्रामीण भागात फायनान्स कंपन्यांनी धुमाकूळ घातला आहे. शेतकर्‍यांना आमिष दाखवून कर्ज घेण्यास या कंपन्या भाग पाडत आहेत. कर्ज घेतल्यानंतर मात्र वसुलीसाठी जाम तगादा लावतात. यामुळे शेतकरी हतबल होऊन आत्महत्येचा निर्णय घेतात. यावर शासनाने अंकुश लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

*