शेतकर्‍यांच्या हद्दीतील काम वाद मिटेपर्यंत थांबवा

0

खा. लोखंडेंच्या आश्‍वासनानंतर शेतकर्‍यांनी उपोषण सोडले : साठवण तलावाचे थांबविण्याचे नगराध्यक्षांचे मुख्याधिकार्‍यांना पत्र

राहाता (वार्ताहर)- पालिकेच्या साठवण तलावाच्या कामाला विरोध करणार्‍या शेतकर्‍याच्या आंदोलनाला भेट देण्याकरीता आलेल्या खासदार सदाशिव लोखंडे याच्यासमोर राहाता पालिकेचे सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व शेतकरी याच्यात बाचाबाची झाली. उपोषण सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या जागेतील तलावाचे काम वाद मिटेपर्यंत थांबविण्यात यावे व इतर काम सुरू ठेवावे असा तोडगा खा. लोखंडे यांनी काढला. त्यानंतर शेतकर्‍यांनी उपोषण सोडले. मात्र नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी संपुर्ण काम थांबवा असे पत्र मुख्याधिकार्‍यांना दिल्याने संपुर्ण तलावाचे कामच वादाच्या भोवर्‍यात आडकण्याची चिन्हे दिसत आहे.

 
राहाता शहरातील कातनाल्यावर तलावाचे काम राहाता नगरपरिषदेने सुरु केल्यानंतर हे बंद करण्याच्या मागणी करीता साकुरी येथील शेतकरी पाच दिवसापासुन धरणे आंदोलन करीत आहे. शनिवारी आंदोलक शेतकर्‍यांना भेटण्याकरीता खा. सदाशिव लोखंडे आले असता या ठिकाणी सत्ताधारी नगरसेवक विरोधी नगरसेवक यांच्यात कधी राहाता पालिकेच्या प्रश्‍नांवर तर कधी तलावाच्या मुद्द्यावर बाचा बाची सुरु होती. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने खासदार लोखंडे यांनी कातनाल्याच्या वादाचा निकाल लागेपर्यत काम बंद ठेवण्याच्या सुचना अधिकार्‍यांना केल्या. मात्र काम बंद ठेवण्यास तहसिलदारांनी असमर्थता दर्शविल्यानंतर उपोषणकर्ते शेतकर्‍यांच्या हद्दीतील काम वाद मिटेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

याला अधिकार्‍यांनी होकार दर्शविला. त्यानंतर शेतकर्‍यांनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी तलावाचे सर्व काम बंद करण्यात यावे असे पत्र मुख्याधिकार्‍यांना दिलेे. त्यामुळे हे काम पुन्हा वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची चिन्हे दिसत आहे. यावेळी नगराध्यक्षा ममता पिपाडा, उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, डॉ. राजेंद्र पिपाडा, धनंजय गाडेकर, डॉ. के.वाय. गाडेकर, नगरसेवक सागर लुटे, विरोधी पक्ष गटनेते विजय सदाफळ, साहेबराव निधाने, विमल आरणे, निलम सोळकी, सचिन गाडेकर, मुख्याधिकारी सतिष दिघे, तहसिलदार माणिकराव आहेर, अनिल बनसोडे, दिलीप वाघमारे, सचिन बनसोडे, नाना बावके, राजेश लुटे, विजय मोगले, गणेश सोमवंशी, बाळासाहेब गिधाड, संजय सदाफळ आदी उपस्थित होते.

  गेल्या आठ दिवसापासुन पालीकेच्या साठवण तलावाच्या कामावरून आंदोलन प्रती आंदोलनाने विषय तापला असुन काम सुरू करावे म्हणून पालीकेचे विरोधी नगरसेवकांनी काही तासाचे उपोषण  केले. काम सुरू होताच ते मागे घेतले तर काम बंद करा म्हणुन साकुरीच्या काही शेतकर्‍यांनी चार दिवसापासून धरणे आंदोलन करत होते. त्यांना पालीका सत्ताधारी नगरसेवकांची साथ मिळत होती. सत्ताधारी व विरोधकांच्या या कुरघोडीच्या राजकारणात साठवण तळ्याचे काम व शेतकर्‍यांचा विषय दोन्ही रखडण्याची चिन्हे दिसत असुन या वादात मात्र अधिकार्‍यांची तारेवरची कसरत होत आहे. सध्या राहाता शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून पाच ते सहा दिवसाआड राहातेकरांना पिण्याचे पाणी मिळत आहे. निधी पडून असतांना केवळ कुरघोडी व श्रेय वादात तहानलेल्या जनतेचा विसर सत्ताधार्‍यांसह विरोधकांना पडला आहे.

 

LEAVE A REPLY

*