शेतकरी संपाचा भडका

0

दूध रस्त्यावर ओतलं, भाजीपाल्याच्या गाड्या रोखल्या

अहमदनगर (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी उस्फुर्तपणे गुरूवारी सकाळपासून (दि.1 जून) संपाला सुरुवात केली आहे. नगर शहरालगत असणार्‍या अनेक गावात तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकर्‍यांनी रस्त्यावर दूध, भाजीपाल ओतून सरकार विरोधातील रोष व्यक्त केला. अनेक ठिकाणी मोठ्या शहराकडे जाणार्‍या भाजीपाला, फळांची वाहने, दूधाचे टँकर अडविण्यात आले. काही ठिकाणी भर रस्त्यावर दूधाचे टँकर ओतून देण्यात आले. भाजप वगळात अन्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी संघटना, मराठा संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव देणे शक्य होणार नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्याने शेतकरी व शासन यांच्यातील मंगळवारी रात्री झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासूनच संपकरी शेतकर्‍यांनी आपली कुमक गनिमी काव्याने महामार्गांच्या दिशेने रवाना केली होती. दरम्यान, भाजपा सरकारची कोंडी करण्यासाठी शिवसेना, मराठा क्रांती मोर्चा, शिवप्रहार संघटना, शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी शेतकरी संपाच्या पाठिशी मोठी ताकद उभी केली आहे. शेतकरी संपाला शिवसेना, मराठा क्रांती मोर्चा, शेतकर्‍यांचा विविध 37 संघटनांनी समर्थन दिले आहे. भाजीपाला व दुधाची

वाहने रोखण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतल्याचे सांगण्यात आले. एकीकडे शिवसेना संपात उतरली असतानाच राष्ट्रवादीनेही संपाला पाठिंबा दिला आहे.
नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे सकाळी शेतकर्‍यांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले. या ठिकाणी शेतकर्‍यांनी रस्त्यावर बटाटे टाकत दूध ओतले. सुमारे 4 तास या ठिकाणी आंदोलन सुरू होते. तालुक्यातील खातगाव टाकळी, शिंगवे, साकत दहिगाव, खडकी या ठिकाणी शेतकरी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन केले. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा समावेश होता.
नगर-कल्याण महामार्गावर पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेशवर जवळ शेतकर्‍यांनी वाहनाची तपासणी करून पुढे सोडल्या. या ठिकाणी दूध, भाजीपाला आणि फळे घेवून जाणारी वाहने रोखण्यात आली. शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाल्या शिवाय संप मागे न घेण्याचा निर्धार यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

बाजारसमितीमध्येही शेतकर्‍यांचे आंदोलन
अहमदनगर मार्केट कमिटीतील भुसार मालाचे लिलाव बंद करण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले होते. त्यानुसार लिलाव बंद करण्यात आले आहेत. तसेच हमाल संघटनेनेही माल उतरून न घेण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. आज कांदा लिलाव झालेले आहेत. मात्र, आवक कमी होती. उद्यापासून (दि. 2 जून) नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ठाण मांडून बसणार. आलेला माल उतरवून दिला जाणार नाही. शेतकर्‍यांनी नुकसान टाळण्यासाठी सहकार्य करावे. नगरसह कोणत्याही बाजार समितीत शेतमाल पाठवू नये.
-अनिल घनवट, अध्यक्ष, शेतकरी संघटना, महाराष्ट्र

शेतकरी संपला काँग्रेसने देखील पाठिंबा दिला असून संगमनेर शहरात बाजार समितीच्या गेटवर काँग्रेस आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळी शेतकर्‍यांनी भाजीपाल्याचे मुंबईकडे जाणारे ट्रक रोखून धरले तसेच टोमॅटो व भाजीपाला रस्त्यावर फेकला. रास्तारोको मुळे नाशिक-पुणे हाय वे वरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

पुणतांबा येथे प्रभात फेरी आणि भजन
संपाची पहिली हाक देणार्‍या पुणतांबा व परिसरातील शेतकर्‍यांनी 100 टक्के संपात सहभाग घेतला असून सरकारचा निषेध करण्यासाठी गावातून प्रभात फेरी काढली आणि दिवसभर शेतकर्‍यांनी भजन केले.दूध घरीच आटवून पनिर, खवा शेतकर्‍यांनी बनविला.

शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा, तसेच शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी अशा विविध मागण्यांसाठी शेतकर्‍यांनी राज्यव्यापी संपाचा एल्गार पुकारला आहे. पीक काढायचे नाही, दूध शहरापर्यंत पोहोचवायचे नाही आणि कोणत्याही शेतमालाची विक्री करायची नाही, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे.

नगर कृषी उत्पन्न बाजार समिती ओस
शेतकरी संपामुळे नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला विभाग ठप्प झाला आहे. शेतकर्‍यांनी समितीकडे पाठ फिरवल्याचे सकाळी दिसून आले. व्यापारी वर्गही भाजीपाला विभागाकडे फिरकला नाही. एरव्ही गजबजलेल्या समितीत आज शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

गांधी मैदानात दुधाचा तुटवडा
नगर जिल्ह्यात सुमारे 3 हजार 500 दूध संकलन केंद्र असून 500 च्या जवळापास लहान मोठे दूध शीतकेंद्र आहेत. यातील बहूतांशी ठिकाणी दूधाची खरेदी झाली नाही आणि ज्या ठिकाणी दूधाची खरेदी झाली ते शहरापर्यंत शेतकर्‍यांना पोहचू दिले नाही. नगर शहरातील प्रसिध्द असणार्‍या गांधी मैदानात दूधाची आवक कमी होती. या ठिकाणी ग्रामीण भागातून दुधाचा पुरवठा झाला नाही.

शहरातील जनता गॅसवर
दुसरीकडे शेतकर्‍यांनी संप पुकारल्यामुळे शहरातली जनता गॅसवर आहे. शेतकरी संपावर गेल्याने भाजीपाला, दूध कसं मिळणार यासह अनेक प्रश्नांमुळे शहरातल्या जनतेची तारांबळ उडाली आहे.

संपाचा भडका दृष्टीक्षेपात..
नगर-मनमाड रस्त्यावर शिंगवे तुकाई येथे शेतकर्‍यांचा रस्ता रोको, वाहनांच्या लांबच लांब रांगा
राळेगण थेरपाळ येथे शेतकर्‍यांनी दुधाचा टँकर फोडला.
संगमनेर-तळेगाव दिघे चौफुलीवर दुधाचा टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतले.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव व नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील आठवडे बाजार बंद
टाकळी खातगाव, शिंगवे, साकत येथे शेतकर्‍यांचा रस्तारोको.
कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेशमध्ये टेम्पो जाळला

LEAVE A REPLY

*