शेतकरी-पोलिसांत पार्किंगवरून बाचाबाची

0

मार्केट यार्डातील घटना, पोलीस नरमले

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरातील मार्केटयार्ड परिसरात वाहने लावण्याच्या कारणावरुन शेतकरी व पोलिसांमध्ये सोमवारी दुपारी शाब्दीक चकमक झाली. वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या चार दुचाकी वाहनांना ताब्यात घेऊन पाच मोठ्या वाहनांना जामर बसविण्यात आले होते. त्या कारणातून पोलीस व शेतकरी यांच्यात चांगलीच तू-तू मै-मै झाली.
मार्केट यार्ड परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. या परिसरात शेतकर्‍यांना कोठेही पार्कींगची व्यवस्था नसून शेतकर्‍यांची मोठी गैरसोय झाली आहे. मंगळवारी (दि.20) दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही शेतकरी भाजी मार्केटमध्ये गेले होते. या दरम्यान शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी चार वाहने ताब्यात घेतली. तसेच पाच चारचाकी वाहनांना जामर बसविले होते. हा प्रकार शेतकर्‍यांनी पाहिला असता त्यांनी पोलिसांची चांगलीच खरडपट्टी काढली. मार्केटयार्ड परिसरात कोठे पार्कींगची व्यवस्था नाही. विक्रेते त्यांच्या दुकानासमोर वाहने लावू देत नाहीत, वाहने कोठे पार्क करावीत, कोठे करू नये अशा प्रकारच्या पाट्या नाहीत. रस्त्यावर वाहने लावली तर पोलीस जप्त करतात. अशा प्रकारे शेतकर्‍यांची सर्वत्र गोची झाली आहे. पोलीस प्रशासनाचे कर्मचारी पावती फाडण्याऐवजी अर्थपूर्ण ताडजोडी करतात अशी प्रतिक्रीया नेप्ती येथील बाबासाहेब होळकर या शेतकर्‍याने दिली. त्यामुळे पोलिसांनी भाजी मार्केट यार्डासाठी पार्कींगची व्यवस्था करावी किंवा पी वन, पी टू अशा पद्धतीचा अवलंब करावा मग कारवाई करावी असे शेतकर्‍यांची म्हणणे आहे. शेतकर्‍यांच्या या आक्रमक धोरणामुळे पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत सर्व वाहने विनादंड सोडून दिली.

LEAVE A REPLY

*