शेतकरी-पोलिसांत झोंबाझोंबी

0

संजीव भोर पोलिसांच्या ताब्यात : भाज्या दुपटीने महागल्या

अहमदनगर (प्रतिनिधी) –  नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला विभाग शुक्रवारी सकाळी सुरू असल्याची माहिती मिळताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तिकडे धाव घेतली. आंदोलकांनी बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बळाचा वापर करत तेथून आंदोलनकर्त्यांना पिटाळून लावले. शेतकरी संपाप्रश्‍नी नगर-कल्याण रस्ता अडविल्याप्रकरणी शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर यांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नगर शहरात भाजीपाला व दुधाची आवक घटल्याने भाव दुपटीने वाढले आहेत.

अखेर आंदोलकर्त्यांनी पोलीस आणि सरकारचा निषेध करत बाजार समितीचे सचिव भिसे यांना निवदेन दिले. तसेच भाजीपाला विक्रीसाठी घेवून आलेल्या शेतकर्‍यांना उद्या शनिवारी भाजीपाला विक्रीस न आणण्याचे आवाहन केले. नगरच्या बाजारात येणारी भाज्यांची आवक 80 टक्के घसरल्याने भाज्यांचे भाव कडाडले आहेत. संपकरी शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री  फडणवीस यांनी केलेल्या चर्चेत तोडगा निघू न शकल्याने दुसर्‍या दिवशीही शेतकर्‍यांचा संप सुरूच आहे.
शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे नगरच्या भाजीमार्केटमध्ये गुरुवारी ग्रामीण भागातून रोजच्या तुलनेत तब्बल 80 टक्के भाजीपाला आवक कमी झाली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी भाज्यांच्या दरात तब्बल दोन ते तीन पट वाढ झाली असून सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसला आहे. दरम्यान, संप न मिटल्यास भाज्यांचे दर अजूनच वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून हीच परिस्थिती दुधाची झाली आहे.
मार्केटयार्ड येथील भाजीमार्केटमध्ये रोज जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शेतकरी भाजी विक्रीसाठी घेऊन येतात. मार्केटमधील आडते व्यापारी शेतकर्‍यांकडून ही भाजी खरेदी करतात. शहरासह, सावेडी, भिंगार, केडगाव या उपनगरातील विविध भाजी मार्केटमध्ये बसणारे विक्रेते आडते व्यापार्‍यांकडून भाजीची खरेदी करून ती किरकोळ बाजारात विकतात. गुरुवारी पहाटेपासूनच आडते व्यापारी भाजीमार्केटमध्ये आपली दुकाने उघडून बसली होती. परंतु शेतकरी संपामुळे रोजच्या पेक्षा तब्बल 80 टक्के भाज्यांची आवक कमी झाली. परिणामी भाज्यांचे दर तब्बल दोन ते तीन पटीने वाढले. रस्त्यावर बसून वा विविध कॉलन्यांतून फिरून किरकोळ विक्री करणार्‍या विक्रेत्यांना रोजच्यापेक्षा दुप्पट पैसे देऊन भाजी खरेदी करावी लागल्याने किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर किलोमागे तब्बल 20 ते 50 रुपयांनी वाढले होते.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी नगरच्या बाजार समितीमधील भाजीमार्केट सुरू झाले. या ठिकाणी ग्रामीण भागातून अल्प प्रमाणात भाजी विक्रीसाठी दाखल झाली होती. भाजी मार्केट सुरू झाल्याचे कळताच शेतकरी संघटनेचे बच्चू मोडवे, अमोल तोडमल, पद्माकर कोरडे, भास्कर मोडके, बाबा मोडके, मोहन पादिर, ज्ञानदेव गवळी यांनी भाजी मार्केटमध्ये धाव घेतली. मार्केट कमीटीचे गेट बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असणार्‍या पोलीसांनी बळाचा वापर करत आंदोलन कर्त्यांना या ठिकाणाहून हटवले. नगर तालुक्यात अनेक गावात दुसर्‍या दिवशी शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू होते.

किरकोळ बाजाराकडे शेतकर्‍यांची पाठ
नालेगाव, चितळेरोड या भागात असणार्‍या मार्केटमध्ये अनेक शेतकरी स्वतः भाजी विक्री करण्यासाठी येतात. गुरुवारी मात्र या दोन्ही ठिकाणी शेतकर्‍यांनी भाज्या विक्रीसाठी आणल्या नव्हत्या. त्यामुळे या दोन्ही बाजारांमध्ये शुकशुकाट होता. भाजी महाग झाल्यामुळे ग्राहकांचीसुद्धा खरेदीसाठी तुरळक गर्दी होती. शेतकरी संपाचा परिणाम दूध बाजारावर झाला असून, शुक्रवारीही गांधी मैदानातील रोजच्या दूध बाजारात ग्रामीण भागातून दुधाची आवक झाली नाही. केवळ शहरी भागातील दूध विक्रेते या ठिकाणी होते. शेतकर्‍यांनी रतिबाचे दूध विक्रीस आणले नाही, त्यामुळे अनेक नागरिकांना जादा दराने दूध विकत घ्यावे लागले.

दोन दिवसांपूर्वी 8 ते 10 रुपयांना मिळणार्‍या कोथिंबीर जुडीसाठी भाजीमार्केटमध्ये आज 20 ते 25 रुपये मोजावे लागले. तर एक किलो टोमॅटोचा दर 20 ते 25 रुपये होता. किरकोळ बाजारामध्ये तर ग्राहकांना टोमॅटो 30 ते 35 रुपयांना किलोभर घ्यावे लागले. दोन दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर हे 10 ते 15 रुपये किलोच्या दरम्यान होते. इतर भाज्यांच्या दरामध्येही तब्बल किलोमागे 15 ते 25 रुपयांनी वाढ झाली असून, संप सुरूच राहिल्यास शुक्रवारी दर अजून वाढण्याची शक्यता आहे.

17

LEAVE A REPLY

*