शिवसेनेवर गुन्हा दाखल करा

0

रायगडावरून संघर्षयात्रेस सुरूवात; ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची सरकारवर टीका

महाड – शिवसंपर्क अभियानामध्ये उस्मानाबाद येथे शेतकर्‍यांच्या कार्यक्रमात तोतया आमदार उभा केला म्हणून शिवसेनेविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
शेतकरी कर्जमाफी व हमीभाव या मागण्यांसाठी विरोधी पक्षांनी सुरू केलेल्या संघर्ष यात्रेचा प्रारंभ करताना बुधवारी सकाळी महाड येथे आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी ते बोलत होते. विखे म्हणाले की, सत्ताधारी भाजप व शिवसेना कर्जमाफीचा निर्णय घेण्याचे कर्तव्य बजावण्याऐवजी यात्रा काढून शेतकर्‍यांच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आ. प्रा. जोगेंद्र कवाडे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि आमदारांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
ना. विखे म्हणाले की, राज्य सरकारमध्ये दरोडेखोर असल्याचे उद्धव ठाकरेंनी अकोल्यात म्हटले. हे दरोडेखोरांचे सरकार असेल तर शिवसेनाही त्यात सहभागी असल्याचे त्यांनी विसरू नये. शिवसेनेचे शेतकरी प्रेम, कोकण प्रेम, मंत्र्यांचे राजीनामे अन् शिवसंपर्क अभियान सारे थोतांड आहे. जोपर्यंत शिवसेना शेतकरी कर्जमाफीसाठी मंत्र्यांचे राजीनामे देत नाही, तोपर्यंत त्यांच्या एकाही शब्दावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही.
भाजपचीही परिस्थिती शिवसेनेसारखीच आहे. येत्या 25 तारखेपासून ते शिवार संवाद यात्रा सुरू करत आहेत. परंतु भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे पाटील यांनी शेतकर्‍यांबाबत वापरलेल्या शिवराळ भाषेतून बळीराजाविषयी त्यांची मानसिकता स्पष्ट झाली आहे. शिवार संवाद यात्रेऐवजी शिवराळ संवाद यात्रा त्यांनी काढावी अशी टीका विखे यांनी सरकारवर केली.

  सरकारने जीएसटीसाठी 20 तारखेपासून तीन दिवसांचे विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. शेतकरी आत्महत्यांचा गंभीर प्रश्न लक्षात घेता कर्जमाफीची घोषणा करण्यासाठी आम्ही राज्यपालांच्या माध्यमातून सरकारला विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली. परंतु, अद्याप सरकारने यावर निर्णय घेतलेला नाही. सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेनाही विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करते आहे. तरीही हे सरकार विशेष अधिवेशन घेण्यास तयार नाही. यावरून सरकारचा नकारात्मक दृष्टीकोन दिसून येतो, असे विखे यांनी म्हटले आहे.

 केंद्र व राज्य सरकार केवळ पोकळ घोषणांचा कारभार करते आहे.  काळा पैसा शोधून काढण्यासाठी केंद्र सरकारने नोटाबंदी केली. पण् त्यातून काळा पैसा सापडला की नाही, ते सरकारलाच ठाऊक नाही. पण् लोकांच्या मेहनतीचा पांढरा पैसा गायब झाला. मागील अनेक दिवसांपासून एटीएममध्ये खडखडाट असल्याने अरे कुठे नेऊन ठेवल्या नोटा आमच्या?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत असल्याचे ना. राधाकृष्ण विखे पाटील सांगितले.

LEAVE A REPLY

*