शिवसेनेचा अल्टीमेटम भाजप मानित नाही

0

 प्रदेशाध्यक्ष दानवेः स्वबळावर सत्ता न मिळाल्यानेच शिवसेनेची खेळी

शिर्डी (प्रतिनिधी)- शिवसेना सत्तेत सहभागी आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकत्र निर्णय घेतले जातात. तेथे शिवसेना मौन पाळते मात्र बाहेर बोलते. शिवसेनेला स्वबळावर सत्ता हवी होती मात्र ती मिळाली नाही. हा रोष जनतेवर व्यक्त करता येत नसल्याने भाजपावर व्यक्त होत आहे. शिवसेनेची ही राजकीय खेळी असल्याचा गौप्यस्पोट करत, भाजपाला याची सवय झाली आहे. त्यामुळे सत्तेतुन बाहेर पडण्याचे शिवसेनेने कितीही अल्टीमेटम दिले तरी ते आम्ही मानत नाही असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे साईदर्शनासाठी शिर्डीत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, विश्‍वस्त भाऊसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, नगरसेवक रविंद्र गोंदकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, भाजप शिवसेना गुण्यागोविंदाने सत्तेत नांदत आहे. मंत्रिमंडळात जे निर्णय होतात त्याला दोघांची संमती असते. कर्जमाफीवरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. यावर पत्रकारांनी छेडले असता दानवे म्हणाले ही शिवसेनेची राजकीय खेळी आहेे.

शेतकर्‍यांच्या कर्जमाफी बद्दल बोलताना ते म्हणाले भाजप कर्ज माफीच्या विरोधात नाही. मात्र शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी कर्जमाफी हा जालीम उपाय नाही. शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नये यासाठी शेतीमध्ये शाश्‍वत गुंतवणूक करावी लागणार आहे. यात वीज, मागेल त्याला शेततळे, जलयुक्तची कामे करुन पाणी अडविणे, शेतमालाला बाजारात नेण्यासाठी पक्के रस्ते आदी पायाभुत सुविधा उपलब्ध करून शेतकर्‍यांना बळकट करणार आहे.

त्यानंतर कर्जमाफी केली तर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही.व आत्महत्येपासुन शेतकरी परावृत्त होईल. यापुर्वी दोन वेळा कर्जमाफी देवुनही आत्महत्या थांबल्या नाही. त्यामुळे पायाभुत सुविधा निर्माण करण्यावर आमचा भर असून भाजप कर्जमुक्तीच्या विरोधात नाही.

गेली 15 वर्ष शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरलेले विरोधी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढत आहे. या यात्रेतील पहीला टप्पा चंद्रपुर येथे सुरु होवुन पनवेल येथे समारोप झाला. यात्रे दरम्यान चंद्रपुर महापालिका निवडणुक झाली. ती आम्ही जिंकली आणि पनवेलची निवडणुक होणार आहे, तीही आम्हीच जिंकणार.

ज्या ज्या रस्त्याने ही यात्रा गेली त्या रस्त्यांच्या महानगरपालिका व जिल्हा परिषदा आम्ही जिंकल्या. याचा अर्थ 15 वर्ष सत्तेत राहुन यांनी केले नाही ते भाजप सरकार करते हे जनतेने दाखवून दिले. तुर व कांद्याच्या प्रश्‍नावर बोलतांना ते म्हणाले हा प्रश्‍न पहिल्यांदाच उद्भवला असे नाही. युपीए सरकारच्या काळात शरद पवार कृषी मंत्री असतांना कांद्यावर अक्षरशः रोलर फिरविला होता.

साखरेचे भाव वाढले तेव्हा चार दिवस साखर खाल्ली नाही तर फरक पडत नाही, हे सांगणारेच पवार साहेबच होते. त्यामुळे हि परस्थिती मागणी आणि पुरवठा यावर आवलंबुन आसतेे. यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाले.

व्यापार्‍यांनी हमीभावापेक्षा कमी दराने तुर खरेदी करू नये यासाठी सरकारने 25 टक्क्यापेक्षा कितीतरी अधिक तुर खरेदी केली आहे. शेतीसाठी पहिल्यांदाच 23 हजार कोटीच तर सिंचनासाठी 7 हजार कोटीच बजेट राज्य सरकारने केले असून शेतकर्‍यांना पायाभूत सुविधा देवुन मजबूत बनविण्याचे काम आमचं सरकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*