शिवप्रहारने शिर्डीत महामार्ग रोखला

0

शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास गनिमी काव्याचा वापर

 

शिर्डी (प्रतिनिधी) – शेतकर्‍यांनी शासनाच्या विरोधात पुकारलेला संप दुसर्‍या दिवशी आणखीच तीव्र दिसून आला. शिर्डीत भाजी मंडई व फ्रुट मार्केट बंद ठेवण्यात आले. शिवप्रहार संघटनेच्या वतीने शिर्डी साकुरी शिवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन मागण्या पूर्ण करा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यासाठी गनिमी काव्याचा अवलंब करू असा इशारा शिवप्रहारचे सचिन चौगुले यांनी दिला.

 
शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपाची तीव्रता दुसर्‍या दिवशी आणखीच वाढली आहे. शासन ठोस निर्णय घेत नसल्याने सर्वत्र संपाचे मोठे पडसाद उमटत आहेत. शिर्डीत छत्रपती शासन च्या वतीने शहरातील फ्रूट मार्केट बंद ठेवण्याची हाक देण्यात आली. शिर्डीतील फ्रूट मार्केट व भाजीमंडई 100 टक्के बंद ठेवण्यात आली. शिर्डी साकुरी शिवेवर शिवप्रहार संघटना व शेतकरी बांधवाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पोलीस प्रशासनाने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी याठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

 

 

शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामिनाथन आयोग लागू करावा, सात बारा कोरा करावा, दुधाचे दर वाढविण्यात यावेत आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. शेतकर्‍यांनी तीव्र स्वरुपात संपात व्यक्त केला. यावेळी शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या संप यापेक्षा आणखी उग्र स्वरुपाचे छेडले जाणार आहे. गमिनी काव्याने आंदोलन उभारून सरकारला शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्यात भाग पाडू, शेतकर्‍यांच्या हक्कासाठी भव्य लढा उभारणार असून जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर सरकारला याचे मोठे परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

LEAVE A REPLY

*