शिवजयंतीची तयारी अंतिम टप्प्यात; मंडळांकडून विविध उपक्रमांवर भर

0

नाशिक । दि. 13 प्रतिनिधी
तिथीनुसार साजरी केली जाणारी मार्च महिन्यातील शिवजयंती उद्या (दि.15) रोजी होत आहे. शिवजयंतीनिमित्त शहरातील चौकाचौकात शिवभक्तांनी तयारी सुरू केली आहे. तर मिरवणूक मार्गाची पाहणी करून पालिका प्रशासनाने दुरुस्ती सुरू केली आहे.

तिथीप्रमाणे असणारी शिवजयंती बुधवारी (दि.15) साजरी केली जाणार आहे. शिवजयंती उत्सवाचा उत्साह सर्वत्र संचारला असून वेगवेगळ्या राजकीय मंडळांसह, सामाजिक संघटना आणि मंडळे शिवजयंतीची तयारी करीत आहेत. महाराजांची जयंती सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून साजरी करण्याची परंपरा याही वर्षी अबाधित ठेवण्याचे प्रयत्न दिसून येत आहेत.

सामाजिक संघटना आणि मित्र मंडळांच्या वतीने शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, व्याख्याने अशी सामाजिक कार्येदेखील आयोजित करण्यात येत आहेत. विविध मंडळांनी शिवजयंती धडाक्यात साजरी करण्याचे ठरविले असून त्यासाठी कार्यकर्ते तयारीमध्ये मग्न झाले आहेत. शिवजयंतीनिमित्त विविध देखावे, मावळे, किल्ले यांच्या प्रतिकृती उभारण्याचे काम गतीने सुरू झाले आहे.

शहरामध्ये पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या उत्सवाला अवघे दोन दिवस उरले असल्याने शिवप्रेमी कार्यकर्ते जयंतीचे कार्यक्रम साजरे करण्यासाठी प्रयत्नशील झाले आहेत. शिवजयंतीचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवण्यावर काही तरुण मंडळांनी भर दिला आहे. शिवजन्मकाळ, यासह शिवचरित्रातील जिवंत देखाव्यांवर भर देण्यात येणार आहे. मिरवणुकीत सर्व मंडळांचे आकर्षक देखाव्यांवर भर असणार आहे.

दरम्यान, पारंपरिक मिरवणूक मार्गाची महापालिकेच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली असून आवश्यक ठिकाणी दुरुस्तीस प्रारंभ करण्यात आला आहे. वाकडी बारव येथून सुरू होणारी शिवजयंती मिरवणूक चौक मंडई, दादासाहेब फाळके रोड, दूधबाजार, भद्रकाली मार्केट, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइर्ंंट, महात्मा गांधी रोड, सांगली बँक सिग्नल, मेहर सिग्नल, जुना आग्रारोड, अशोकस्तंभ, नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, परशुराम पुीरया रोडने रामकुंड येथे जाऊन मिरवणुकीचे विसर्जन होणार आहे.

वाहतूक, बस मार्गात बदल
शिवजयंतीनिमित्त होणार्‍या मिरवणुकीमुळे वाहतूककोंडी होऊ नये म्हणून मिरवणूक मार्गावर दुपारी 12 पासून सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तर बसच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

यानुसार पंचवटी डेपो – 2, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा येथून सुटणार्‍या बस पंचवटी डेपो येथून सुटणार आहेत. ओझर, दिंडोरी, पेठ येथून येणार्‍या सर्व बसेस व वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारका सर्कल येथून नाशिकरोड तसेच शहरात इतरत्र जाणार आहेत.

LEAVE A REPLY

*