शिर्डीसाठी 3000 कोटी

0

साई समाधी शताब्दी महोत्सव, आराखड्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

 

शिर्डी (प्रतिनिधी) – साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी राज्य शासन व संस्थानमार्फत करण्यात येणार्‍या विविध कामांच्या सुमारे 3 हजार 23 कोटी 17 लाख रुपयांच्या कृती आराखड्याला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कृती आराखडा समितीने मान्यता दिली. तसेच केंद्र शासनाच्या निधीतून करण्यात येणार्‍या कामांनाही यावेळी मान्यता देण्यात आली. हा महोत्सव जागतिक दर्जाचा व्हावा, यासाठी सर्व संबंधितांनी काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

 

साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कृती आराखड्याचे सादरीकरण कार्यकार अधिकारी रूबल अग्रवाल यांनी केले. तसेच समाधी सोहळ्यानिमीत्त एक डेप्टी कलेक्टर व एक उपविभागीय पोलिस अधिकारी यांना प्रतिनियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली.
साईबाबा यांच्या महानिर्वाणास दि. 18 ऑक्टोबर 2018 रोजी शंभर वर्षे पूर्ण होणार आहे. या निमित्त संस्थानच्या वतीने दि. 1 ऑक्टोबर 2017 ते 18 ऑक्टोबर 2018 या कालावधीत साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येणार आहे. यासाठी महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव कृती आराखडा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज विधानभवनात पार पडली. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य सचिव सुमित मल्लिक, संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सदस्य भाऊसाहेब वाघचौरे, आमदार स्नेहलता कोल्हे, सचिन तांबे, प्रतापराव भोसले, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके, सल्लागार अनिल डिग्गीकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव श्री. जमादार, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महोत्सवाच्या पूर्व तयारीच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक विशेष सेल तयार करण्यात यावा. प्रलंबित रस्त्याची कामे तातडीने मार्गी लावण्यात यावीत. महोत्सव काळात व इतर महत्वाच्या दिवशी गर्दीच्या वेळी स्वच्छता राहील, याची काळजी घेण्यात यावी. तसेच हा महोत्सव जागतिक स्तरावर पोचविण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात यावे. याशिवाय बाह्यवळण रस्त्याची कामेही तातडीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिल्या. साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली कृती आराखडा समिती तसेच मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे.

 

उपसमितीने महोत्सवाच्या पूर्व तयारीच्या प्रारुप आराखड्यास मान्यता दिल्यानंतर आज कृती समितीपुढे हा आराखडा सादर करण्यात आला. या आराखड्यानुसार साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत एकूण 3 हजार 23 कोटी 17 लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 789.62 कोटी रुपयांची तर दुसर्‍या टप्प्यात 2 हजार 233 कोटी 55 लाख रुपयांची कामे होणार आहेत. पहिल्या टप्प्यात दर्शन रांग उभारणे (157.00 कोटी), साईसृष्टी, प्लॅनेटोरियम व व्हॅक्स म्युझियम प्रकल्पाचे बांधकाम करणे (141 कोटी), मल्टिमिडिया थिमपार्क अंतर्गत लेझर शो उभारणे (72 कोटी),

 

साईभक्तांसाठी अतिरिक्त प्रसाद भोजन व्यवस्था करणे (1 कोटी), नवीन भांडार इमारतीचे बांधकाम करणे (13.71 कोटी), भक्तनिवासाच्या खोल्यांचे नुतनीकरण (14.10 को.), संस्थान परिसरात विद्युत पुरवठा क्षमता वाढविणे (14.00 कोटी), संस्थानच्या वाढीव पाणीपुरवठा (58.14 कोटी), माहिती व सुविधा केंद्र (1.28 कोटी), घनकचरा व्यवस्थापन (5.00कोटी), स्वागत कमान उभारणे (1.05 कोटी), संस्थानच्या रुग्णालयातील आयसीयू बेडची संख्या वाढविणे (5.00 कोटी), शिर्डी विमानतळासाठी अर्थसहाय्य (5.00 कोटी), कायमस्वरुपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे (20 कोटी), विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यासाठी (25 कोटी), जमिन अधिग्रहण भाडे (3 कोटी), साईभक्त कॅम्प व तात्पुरत्या स्वरुपात निवास व्यवस्थेसाठी व इतर सुविधा पुरविणे (25.68 कोटी), पोलीसांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था (1.50 कोटी) आणि तात्पुरते वाहनतळ, शौचालय व पाणी पुरवठा यासाठी (12.00 कोटी) आदी कामे संस्थानच्या निधीतून करण्यात येणार आहेत.

 

शिर्डी नगरपंचायतीच्या निधीतून सुमारे 25.90 कोटींची, पोलीस विभागाकडील कामांसाठी 27.28 कोटी, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील कामांसाठी 14.71 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेरसाठी 34.51 कोटी, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 56.80 कोटी, राज्य वीज वितरण कंपनीच्या कामांसाठी 25.76 कोटी, भारत संचार निगमच्या कामासाठी 2.12 कोटी, मध्य रेल्वेच्या कामासाठी 27.08 कोटी रुपयांच्या कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली. दुसर्‍या टप्प्यात संस्थानच्या वतीने राबविण्यात येणार्‍या बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम (43.34 कोटी), साई निवास अतिथीगृहाच्या तळमजल्यावर व्हीव्हीआयपी सूटचे बांधकाम (7 कोटी), साई शताब्दी कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी करणे (100 कोटी), साईसिटी प्रकल्पाची उभारणी (180 कोटी), संस्थानसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनसाठी (139.60 कोटी), शेती महामंडळाच्या शिर्डी परिसरातील जमिनीसाठी (369 कोटी),

 

शिर्डी नगरपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांसाठी भूसंपादन व विकसित करण्यासाठी (229.98 कोटी) आदी कामेही या आराखड्यात समाविष्ट आहेत. विविध शासकीय विभागामार्फत दुसर्‍या टप्प्यात करण्यात येणार्‍या कामांमध्ये शिर्डी नगरपंचायतीसाठी 160.87 कोटी, पोलीसांसाठी 27 कोटी, सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3.62 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग, संगमनेर 538.70 कोटी, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 220.50 कोटी, वीज वितरण कंपनीच्या कामासाठी 25.01 कोटी, राज्य परिवहन महामंडळासाठी 5 कोटी निधीची तरतूद सुधारित आराखड्यात करण्यात आली आहे. त्याशिवाय निमगाव कोर्‍हाळे येथील संस्थानच्या मालकीच्या हरित पट्ट्यातील जमीन रहिवासी करणे, साई प्रसादालय, साई आश्रम-2, स्टाफ क्वार्टर येथील इमारतीचे बांधकाम नियमित करणे, शेती महामंडळाची जमीन कायमस्वरुपी संस्थानला विकत देणे, विश्वस्त व्यवस्था अधिनियमामध्ये सुधारणा करणे आदींचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.

 

साईसृष्टी, म्युझीयमसाठी – 141 कोटी
लेझर शो – 72 कोटी
सीसीटीव्ही कॅमेरे – 20 कोटी
निळवंडेतून थेट पाईपलाईन – 139 कोटी
आयसीयू बेड – 5 कोटी

LEAVE A REPLY

*