शिरसोली रोडवरील कापसाच्या खोलीला आग

0

जळगाव । शिरसोली रस्त्यावर असलेल्या नेहरुनगर मुस्लिम कब्रस्तानमधील खोलीत ठेवलेल्या कापसाच्या गाठीला शॉटसक्रिटमूळे आग लागल्याची घटना आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. पाच अग्निशामन बंबांनी आग विझविण्यात आली असून तोपर्यंत खोलीत ठेवलेला संपूर्ण कापूस जळून खाक झाला. यामध्ये सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, शिरसोली रोडवरील नेहरुनगरात मुस्लिम बांधवांचे कब्रस्थान आहे. या कब्रस्थानची देखभाल ही अमजद अहमद पिंजारी हे करीत असून ते सुरक्षा देखील करतात. तसेच अमजद पिंजारी हे याठिकाणी कापूस व प्लास्टीक यांपासून दोरी बनविण्याचे काम करीत असल्याने त्यांनी दोरी बनविण्यासाठी लागणारा कापूस व प्लास्टीक हे कब्रस्थानमधील एका खोलीत ठेवले होते. आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास खोलीवरुन गेलेल्या वीजवाहीन्यांमध्ये स्पार्किंग झाल्याने त्याच्या ठिणग्या खोलीत ठेवलेल्या कापसावर पडल्या. दरम्यान कापूस व प्लास्टीकने अचानक पेट घेतला. ही घटना कब्रस्थानसमसोरील टपरीचालकाच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ अग्निशामन बंबास पाचारण केले. अवघ्या काही तासातच खोलीत ठेवलेले सर्व साहित्य जळून खाक झाले.

पाच अग्निशामन बंबाचा वापर
आगिची माहिती मिळाताच अवघ्या काही मिनीटातच महापालिकेचा अग्निशामन बंब घटनास्थळी दाखल झाला. यावेळी त्यांच्याकडून आगीवर पाण्याचा मार केला. सुमारे पाच बंब पाणी मारल्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले़

संपूर्ण परिसरात धुरच धूर
कापूस व प्लास्टीकने पेट घेतल्याने कब्रस्थानच्या परिसरात संपूर्ण धूर पसरलेला होता. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी धाव घेतली. यावेळी त्यांनी एमआयडीसी पोलिसांना कळविताच पोलिसांनी देखील त्याठिकाणी धाव घेतली.

LEAVE A REPLY

*