Type to search

शिक्षण दिनाच्या औचित्यावर बुध्दिमंथन व्हावे का?

ब्लॉग

शिक्षण दिनाच्या औचित्यावर बुध्दिमंथन व्हावे का?

Share
आज 5 सप्टेंबर… भारताचे माजी राष्ट्रपती तथा भारताचे तत्त्वज्ञ डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. आजचा त्यांचा जन्मदिन देशभर शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. पण वस्तुस्थिती अनुभवास घेतली तर हा दिन लोकोत्सवाच्या रुपाने नव्हे, तर शासकीय आदेशाने प्रेरित होवून साजरा होण्याची औपचारिकता निदर्शनास आल्याशिवाय राहात नाही.

शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने बुध्दीमंथन व्हावे का? हा प्रश्न अनेक बहुजनवाद्यांच्या मनात घोळतोय.. कारण ज्या ज्या महापुरुषांनी मानवजातीच्या उन्नत्यर्थ कार्य केले. त्यांच्या कार्याचे स्मरण पिढानपिढ्या व्हावे. विद्यार्थ्यांच्या सुपीक मनःपटलावर त्याची रुजवात व्हावी… या अनुषंगाने महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी उत्सव साजरा होणे अपेक्षित आहे. अलिकडे मानसिक गुलामगिरीच्या अनेक श्रृंखला तुटत आहेत आणि अशा गुलामगिरीतून ही प्रतिके संपविण्यासाठी आमची पिढी सजग बनत चालली आहे. कारण, ही सजगता वस्तुस्थितीजन्य आहे. आणि त्यातही व्यक्तीविरोध वा विरोधासाठी-विरोध न होता जे सत्यशोधन आहे, तेच मांडण्याचा प्रयत्न व्हावा. हाच माफक विचार आजच्या चावडी लेखनाद्वारे आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे माजी-राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्ज्ञ होते. यात वाद असण्याचे कारण नाही. पाश्चात्य जगाला भारतीय चिद्वादाचा तात्विक परिचय करुन देणारा भारतावरील ब्रिटीश सत्ताकाळातले महत्त्वाचे विचारवंत म्हणूनही राधाकृष्णन यांची ओळख आहे. यातही दुमत नाही…पण भारताच्या इतिहासामध्ये तळागाळातील मानवासाठी किंवा शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचे आत्मभान जागृत करण्यासाठी डॉ. राधाकृष्णन यांचे कार्य कुठेही उल्लेखित नाही. डॉ. राधाकृष्णन यांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी कोणतीही शाळा सुरु केली नाही. त्यांचे स्वतःचे असे शैक्षणिक तत्त्वज्ञान कुठेही वाचनात नाही. शिक्षक जमातीसाठी किंवा त्यांच्या कल्याणसाठी काही कार्य केल्याचे ऐकिवात नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षण पध्दतीवर कोणतेही पुस्तक त्यांनी लिहिले नाही आणि त्यांची एकंदरीत जिवनपध्दती वैदीक अधिष्ठानावर आधारित होती… असे सत्यशोधन असताना भारत सरकारने सन 1962पासून डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा फतवा काढला.

पण या दिवसाच्या औचित्याविषयी समाधानकारक स्पष्टीकरण मिळत नसल्याने आणि अलिकडे सत्यवादी इतिहासाचे शोधन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने आता अशा प्रकारच्या बुध्दीमंथनाला वाव मिळू लागला आहे. डॉ. राधाकृृष्णन त्यांच्या जागी श्रेष्ठ होतेच. त्यांना विरोध करण्याचा किंवा त्यांची प्रतिमा धुसर करण्याचा प्रयत्न मुळीच नाही. पण त्यांच्या तथाकथित जन्मदिवसाचे औचित्य साधून शिक्षक दिन साजरा होतोय. या प्रश्नावर हा बुध्दीमंथनाचा प्रपंच आहे. अनेक ठिकाणी केवळ शासकीय प्रथा आहे, म्हणूनच शिक्षक दिन साजरा होतो. त्याला लोकोत्सवाचे स्वरुप इतक्या वर्षानंतरही प्राप्त झालेले नाही. मग आता शिक्षक दिन साजरा करावयाचा झाला तर कुणाच्या जयंतीचे औचित्य साधावे हा प्रश्न लक्षात घेताच क्षणाचाही विलंब न होता बहुजनांच्या शिक्षणाचे आद्यजनक राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होते. कारण ज्योतीराव फुले यांनी सन 1848 मध्ये बहुजन मुला-मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरु केली. आणि डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म 1888 मध्ये झाल्याचे सांगण्यात येते. (वास्तविक डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेबर 1888मध्ये झाला नाही, त्यांचा जन्मदिन 20 सप्टेंबर 1887 असा आहे. असे दस्तुरखुद्द डॉ. राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाळ यांनी नमुद केले आहे. संदर्भग्रंथाचे नाव आहे ई ठरवहरज्ञीळीहपरपर र लळेसीरहिू रिसश 10) म्हणजे राधाकृष्णन यांच्या जन्माआधीच फुले यांचे शैक्षणिक योगदान सुरु झाले होते.

राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी स्वतः हातात लेखणी घेवून तळागाळातील मुलांना मोफत शिकविले. गोरगरीब, अनाथ, अस्पृश्य, भुकेल्यांना गोळा करुन त्यांना शिक्षणांच्या मुख्यप्रवाहात आणले. यासाठी त्यांनी कोणाकडून अनुदान घेतले नाही, की वेतन घेतले नाही, उलट स्वतःची शेतजमिन विकून त्यांनी देशात 20 शाळा सुरु केल्या. भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने 1882 मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला होता. यालाच हंटर कमिशन म्हटले जाते. या कमिशनचे अध्यक्ष सर हंटर जेव्हा पुण्यात आला होता. तेव्हा त्याला विरोध करुन एक निवेदन दिले होते. या निवेदनात महात्मा फुले म्हणतात, गोरगरीबांच्या मुलांना वयाच्या 12व्या वषार्र्पर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे आणि पुर्णपणे मोफत करावे. कष्टकरी, शेतकर्‍यांच्या मुलांनी शिक्षण घ्यावे. हे ज्योतिरवांचे कसोशिचे प्रयत्न विसरुन चालणार नाही.

ज्योतिराव फुले यांनी स्वतःची स्थावर मालमत्ता विकून शैक्षणिक समृध्दी घडविण्याचा प्रयत्न केला. तरीही पैसा कमी पडू लागल्याने त्यांनी बांधकामाचे कंत्राट घेतले. खडकवासला धरण, कात्रज घाट, पुण्यातील अनेक पुल, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस आदी बांधकामे करुन त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी अनेक ठिकाणी मोफत शिक्षण देणार्‍या शाळा सुरु केल्या. स्वतःच्या पत्नीला सुविद्य करुन कठीण प्रसंगात शिक्षणासाठी प्रवृत्त केले व सावित्रीमातेनेसुध्दा मुलींना शिक्षण देणेकामी खस्ता खाल्ल्यात.

या सर्व गोष्टींचे बुध्दीमंथन करताना महात्मा ज्योतीबा फुले यांचा 28 नोव्हेंबर हा स्मृतीदिन शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा. असा विचार अनेकांच्या मनात आला. पण स्मृतिदिन, मृत्यूदिवस हा आपण आनंदात साजरा करणे उचित नाही. त्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देऊन गुरुजनांचे कौतुक करणेही साजेसे नाही , म्हणून विद्ये विना मती गेली ।
मती विना निती गेली ।
निती विना गती गेली ।
गती विना वित्त गेले ।
वित्ता विना शुद्र खचले ।
इतके सारे अनर्थ…
एका अविद्येने केले ।
… असे कांठाळी येऊन सांगणार्‍या ज्योतीरावांचा जन्मदिवस (11 एप्रिल) शिक्षक दिन म्हणून संपन्न व्हावा ही भूमिका आमच्या राज्य सरकारने जरी आधी घेतली, तरी किती बरे!
मो. 9545465455
(या लेखासंदर्भात मते मतांतरे असू शकतात. दुसर्‍या विचारांचेही स्वागतच आहे.- संपादक)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!