शिक्षकांच्या बदली धोरणाला आव्हान

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारने 27 फेब्रुवारीला प्राथमिक शिक्षकांचे जिल्हांतर्गत बदली धोरण जाहीर केले आहे. या नवीन बदली धोरणात अनेक जाचक अटी आहेत. या धोरणाला जिल्ह्यातील शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. खंडपीठात या याचिकेवर उद्या मंगळवारी (दि. 9) सुट्टीतील बेंचसमोर सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली.

 
अ‍ॅड. राजेंद्र वसंत टेमकर यांच्या मार्फत खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. यात शिक्षक बदली संदर्भातील सोपे अवघड क्षेत्र निवडण्याच्या पध्दतीवर आक्षेप घेण्यात आला आहे. अवघड आणि सर्वसाधारण धोरणाविषयी सुस्पष्ट सूचना न दिल्याने प्रत्येक सरकारच्या नवीन आदेशाचा वेगवेगळा अर्थ काढून सर्वसाधारण आणि अवघड क्षेत्र निश्‍चित करण्यात आले आहे. जिल्हानिहाय हे प्रमाण कमी-जास्त असले तरी काही जिल्ह्यांनी अवघड क्षेत्रातील शाळा शून्य दाखूवन शिक्षकांमधील रोष कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

 
इतर कोणत्याही संवर्गातील कर्मचारी व अधिकार्‍यांच्या बदल्या सलग सेवा दिनांकानुसार होत नसताना फक्त प्राथमिक शिक्षकांच्याच बदल्या सलग सेवा धरण्यात आली आहे. 30 किलो मीटरच्या आतील व बाहेरील पती-पत्नी भेद केला असून 30 किलो मीटर अंतरावरील पती-पत्नीला प्राधान्य देण्यात देऊन एका युनिटमध्ये काम करण्याची संधी देण्यात येणार आहे.

 

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या तालुकांर्तगत विनंतीनुसार व रिक्त पदानुसार करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. अवघड क्षेत्रातील शिक्षकांच्या बदल्या या पेसाप्रमाणे कराव्यात आणि त्यांना टप्पा क्रमांक 1 अगोदर संधी द्यावी व या पुढील सर्व बदलीप्रक्रिया विनंती आणि रिक्तपदानुसार कराव्यात. भर उन्हाळ्यात बदलीचा हा खो-खो बंद करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली असल्याची माहिती राजेश जगताप, अनिता शिंदे, अंबादास गारूडकर, ईश्‍वर नागवडे यांनी दिली.

 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला पेसा धोरण व नवीन बदली धोरण यात विसंगती दिसते आहे. पेसा क्षेत्रातही सोपे व अवघड क्षेत्र केल्याने सर्वोच्च न्यायालयाचा हा अवमान असल्याने विधिज्ञांशी सल्लासलत करून पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे याचिकाकर्त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*