Type to search

ब्लॉग

शिक्षकदिन आणि आजचे शिक्षण

Share
शिक्षणाचा मूळ हेतू केवळ माहिती देणे हा नसून मानवी मूल्यांची पेरणी शिक्षकांमार्फत व्हायला हवी. मात्र एकीकडे खासगी क्षेत्रातील शिक्षणसंस्था हा फायदेशीर व्यवसाय बनला आहे तर दुसरीकडे अत्यंत तोकड्या मनुष्यबळानिशी चालवल्या जाणार्‍या सरकारी शाळा गुणवत्तावाढीकडे लक्षही देऊ शकत नाहीत इतक्या संकटात आहेत. अशा स्थितीत अध्ययन-अध्यापनास पोषक वातावरण निर्माण होणे अवघड आहे. ते निर्माण होण्यास कटिबद्ध होण्याची प्रतिज्ञा शिक्षकदिन साजरा करताना सर्वांनी करायला हवी. अन्यथा शिक्षकदिन हा एक उपचार ठरेल.

माहिती तंत्रज्ञानामुळे ज्ञानाचा स्फोट झाला आहे. हवे असलेले ज्ञान मिळवण्यासाठी अनेकदा शिक्षकाची गरज नसते. वेबसाईटवरून हवे ते ज्ञान ‘डाऊनलोड’ करून घेता येणे शक्य असल्यामुळे इंटरनेटच सर्वात मोठा शिक्षक झाला आहे. गुरुकुल पद्धतीपासून सुरू झालेला गुरू-शिष्य नात्याचा प्रवास ‘छडी लागे छमछम’मार्गे आज इतक्या दूरवर पोहोचला आहे. शिक्षणाच्या वाटा जसजशा बदलत गेल्या तसतसा विद्यार्थी हा विद्यार्थी न राहता तो ‘कच्चा माल’ बनला आणि त्याला पक्का बनवून ‘मार्केट’मध्ये पाठवणारा सेवक एवढीच शिक्षकाची ओळख राहिली. बाजाराधिष्ठित व्यवस्थेला अनुकूल ‘सेवक’ तयार करणे हे सध्या शिक्षणाचे सर्वात मोठे उद्दिष्ट होऊन बसले आहे. त्यामुळे अर्थातच शिक्षणव्यवस्थेतही बाजारी मूल्ये शिरली आहेत. शिक्षण देणे हा नफा कमावण्याचा व्यवसाय बनल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये पूर्वीचे नाते राहिलेले नाही. हे चांगले की वाईट याचा विचार करण्यापूर्वी असे घडले आहे हे आधी मान्य करावे लागेल. अनेक ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी सोशल मीडियावर ‘फ्रेन्डस्’ म्हणून भेटतात. या दोघांतील अंतर अशाप्रकारे कमी झाले आहे. शिक्षक वा शिक्षणसंस्थेकडून विद्यार्थी त्याला जगण्याला आवश्यक तेवढेच घेत आहे आणि खरे सांगायचे तर त्याहून अधिक देण्या-घेण्याइतका वेळ शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे उरलेलाही नाही. ‘नव्या पिढीच्या आकांक्षा’ असा शब्दप्रयोग आपण वापरतो, मात्र तो विद्यार्थ्यांच्या आकांक्षांशी फारसा संबंधित नसतो, तर बाजारपेठेच्या मागणीशी तो निगडीत असतो आणि ती मागणी पूर्ण करण्याचे कारखाने म्हणजे शिक्षणसंस्था, असे सूत्र बनले आहे.

ही सर्व धावाधव सुरू असताना शिक्षणाद्वारे विद्यार्थ्याला मिळायलाच हवी अशी एक गोष्ट मागे पडली आहे ती म्हणजे मानवी मूल्ये! शिक्षक-विद्यार्थ्यामधील नाते जितके व्यावसायिक बनेल तितकी ही मूल्ये मागेच पडणार आहेत आणि पुढील पिढीत मानवी मूल्यांचा अभाव असणे व्यवहारात जाणवल्याखेरीज राहणार नाही. आताच ते जाणवू लागले आहे. ज्ञानाच्या स्फोटामुळे पारंपरिक शिक्षण आणि शिक्षकांसमोर उभे केलेले मुख्य आव्हान हेच आहे. नवी पिढी खूप लवकर बरेच काही मिळवण्याच्या मागे आहे आणि ज्ञान ही त्यातील एक गोष्ट आहे. ती नेटवरून मिळाली आणि शिक्षकाकडून मिळाली तरी या पिढीला फारसा फरक पडत नाही. परंतु हा इलेक्ट्रॉनिक गुरू आणि शिक्षक यांना समान पातळीवर आणून ठेवणार्‍या या यंत्रणेने शिक्षक-विद्यार्थी नात्यातील ओलावा आणि आदरभाव कमी झाला आहे, ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. यातूनच हळूहळू या नात्याची मर्यादा ओलांडली जाते. नव्या जमान्यातील काही शिक्षकही ‘लोकप्रियता’ मिळवण्यासाठी काम करताना दिसतात आणि त्यासाठी प्रसंगी अशी कामे करताना दिसतात ज्यामुळे त्यांच्यासह शिक्षण व्यवस्थेलाच लांच्छन लागते. परीक्षेत पास होणे आणि नोकरी मिळवणे हे सध्याच्या शिक्षणव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे नव्या पिढीच्या आकांक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांपुढे उभे ठाकले आहे. शिक्षणाबरोबरच कौशल्ये आणि मूल्ये विद्यार्थ्यांना मिळायला हवीत, हा विचार मागे पडला आहे. कॉर्पोरेट विश्वात मानाने मिरवू शकतील असे रोबो तयार करण्याऐवजी मानवता, प्रामाणिकपणा आणि अन्य गुणसमुच्चयाने युक्त माणसे तयार करणे आवश्यक आहे. मात्र ते सध्याच्या शिक्षक-विद्यार्थी नात्यामुळे घडताना दिसत नाही.

‘शिक्षण म्हणजे काय?’ हे सर्वात आधी समजावून घ्यायला हवे. शिक्षण म्हणजे केवळ माहिती देणे-घेणे नाही. नव्या युगात तांत्रिक शिक्षण आवश्यक आहेच, परंतु त्यामुळे बौद्धिक विकास आणि लोकशाही मूल्यांची, मानवी भावभावनांची पेरणी अनावश्यक बनली आहे, असे म्हणता येईल का? या भावना आणि जाणिवाच व्यक्तीला एक परिपूर्ण नागरिक बनवतात. शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट मानवतेविषयीचा समग्र द़ृष्टिकोन तयार करणे, ज्ञानाप्रती समर्पित भावना निर्माण करणे आणि सतत शिकत राहण्याची प्रवृत्ती निर्माण करणे हा आहे. समाजव्यवस्था बाजाराभिमुख असली तरी शिक्षण ही बाजारपेठ नसून मानव तयार करण्याचे महत्त्वाचे साधन आहे. जेवढ्या लवकर आपण ही गोष्ट ओळखू तेवढेच शिक्षणव्यवस्थेचे भले होणार आहे. असे झाले तरच आपण शिक्षक दिवस खर्‍या अर्थाने साजरा करू शकू आणि माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे स्वप्न साकार करू शकू. संपूर्ण शिक्षणव्यवस्था एक व्यापार बनली आहे. भांडवलवादी जगाचे बदलते स्वरूप आणि परिप्रेक्ष्यात शिक्षणाचा खरा हेतू समजून घेतला जात नाही. एडिन्बरा येथे केलेल्या भाषणात डॉ. राधाकृष्णन म्हणाले होते, ‘संपूर्ण मानवजातीची मुक्ती हे शिक्षण आणि मानवी इतिहासाचे उद्दिष्ट आहे’. परंतु ‘बहुजन हिताय’ या भूमिकेपासून ढळून अनेकजण शिक्षणाच्या मुख्य परिघाबाहेर राहू लागले तर मात्र शिक्षणाच्या मूळ हेतूलाच बाधा येते.

मानवी श्रमाची उपेक्षा झाल्याने शिक्षक आणि विद्यार्थी अशा दोघांनाही भांडवलवाद आणि बाजारपेठेचे भाट बनवले आहे. शिक्षणाप्रती असलेला एकंदर दृष्टिकोन इतका व्यावसायिक बनला आहे की, सुखसुविधा पुरवण्यासाठी जे शिक्षण उपयुक्त, त्यालाच आपण सर्वश्रेष्ठ शिक्षण मानू लागलो आहोत. शिक्षणाची इतर महत्त्वाची अंगे संपूर्णपणे दुर्लक्षिली गेली आहेत. अशा पार्श्वभूमीवर उपचार म्हणून शिक्षकदिन दरवर्षी 5 सप्टेंबरला साजरा केला जातो आणि डॉ. राधाकृष्णन यांची आठवण आपण काढतो. खरे तर शिक्षणाच्या मूलभूत उद्देशापासून आपण कधीचे ढळलो आहोत. आर्थिक उदारीकरणाच्या आजच्या काळात प्रत्येकाला पुढेच जायचे आहे आणि सर्वात पुढे राहायचे आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोज आपण नवनवीन क्षितिजे काबीज करीत आहोत.

आज आपण अंतराळात मानव पाठवण्याच्या तयारीत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे तंत्रज्ञ निर्माण करणार्‍या तसेच हमखास नोकरी मिळवून देणार्‍या अभ्यासक्रमांना उच्च प्राधान्य दिले जात आहे. परंतु नैतिकता आणि मानवता या स्तरावर आपली दिवसेंदिवस घसरण होत चालली आहे.

त्यामुळेच एवढी प्रगती करूनसुद्धा शिक्षणाच्या स्तरावर आपली दिवसेंदिवस पीछेहाटच सुरू आहे. शिक्षण आवश्यक का आहे आणि शिक्षणाचा हेतू काय, हा मूळ प्रश्न आहे. पदवी मिळवणे आणि शिकणे यातील फरक याच ठिकाणी समजून घ्यावा लागतो. शिक्षण हा अधिक व्यापक शब्द आहे. समाजाला पुढे घेऊन जाण्यात सर्वाधिक वाटा शिक्षणाचा असतो आणि तोच उद्देश मागे ठेवून आपण केवळ ‘माहिती’ घेण्याला शिक्षण समजत आहोत.

प्राथमिक शिक्षण सर्वांना सक्तीचे आणि मोफत करण्यासाठी आपण शिक्षण हक्क कायदा केला. 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळाला. परंतु या वयोगटातील मुलांची शाळांमधून गळती सुरूच राहिली. मध्यान्ह भोजनासारखे अनेक उपक्रम राबवूनही शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवण्यात यश आले नाही. शिक्षकांची कमी संख्या, शाळांच्या इमारतींची कमतरता अशा कारणांमुळे आपण शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करू शकलो नाही. उपलब्ध असणार्‍या मर्यादित शिक्षकांना असंख्य अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. प्राथमिक शाळांमध्ये दोनपैकी एका शिक्षकाकडे शासनाचे उपक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी असते. 75 टक्के शाळांमधून दोनपैकी एक शिक्षक हे काम करतो. उर्वरित एका शिक्षकाला पाच वर्ग सांभाळावे लागतात. अशा वातावरणात सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शाळांच्या अनेक इमारती मोडकळीस आल्याचे पाहायला मिळते.

क्रीडांगणे, प्रसाधनगृहे नसतात. दुर्गम भागातील शाळेत झालेली बदली म्हणजे ‘शिक्षा’ मानली जाते. एकशिक्षकी शाळांमध्ये तर शिक्षकच मुलांचे पाणी भरण्यापासून स्वच्छतेपर्यंतचे काम करताना दिसतो. अशा स्थितीत अध्ययन-अध्यापनासाठी पोषक वातावरण कसे निर्माण होणार? शैक्षणिक दर्जाचे अवलोकन करणार्‍या निरीक्षण पथकांना शिष्यवृत्ती, गणवेश, अभिलेख, मॅपिंग, मध्यान्ह भोजन अशा बाबींवर देखरेख करून अहवाल सादर करण्याचे काम दिले जाते. शिक्षणाच्या दर्जाचे अवलोकन ही पथके कशी करणार? एकंदरीत, शहरी भागात विशेषतः खासगी शिक्षण क्षेत्रात शिक्षक हा ‘प्रोफेशनल’ झाला आहे, तर सरकारी क्षेत्रात आणि खेडोपाडी अध्यापनाचे काम करणारा शिक्षक ‘ऑल इन वन’ झाला आहे. दोन्ही ठिकाणी शिक्षणाचा मूळ हेतू साध्य करण्याजोगे वातावरण नाही आणि ते निर्माण करण्याचा चंग बांधणे हेच शिक्षकदिन साजरा करण्यामागील प्रमुख प्रयोजन आता असायला हवे.
– डॉ. गौरांगी जोशी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!