शासन-प्रशासनात उघड विसंवाद?

0

महाराष्ट्रात आणि देशाच्या सत्तेत ‘नव्या’ दमाचे आणि ‘पारदर्शी’पणाचा आव आणणारे ‘बोलघेवडे’ राज्यकर्ते सुस्तावले आहेत. गेल्या चार वर्षांत मात्र देशवासियांना वेगवान कारभार अनुभवास आलेला नाही. जे चित्र दिल्लीत, मुंबईत तेच नाशकातही उमटावे हा योगायोग म्हणावा की दैवदुर्विलास? शासन-प्रशासनातील संवाद हरवला आहे. किंबहुना विसंवाद वाढला असून समन्वयाचा अभाव पदोपदी जाणवत आहे. नाशिक मनपा आणि जिल्हा परिषद यांच्या स्थायी समित्यांच्या सभा परवा झाल्या.

त्यावेळीही याचा प्रत्यय आला. मनपा सभेत लोकप्रतिनिधींनी शहरातील डेंग्यू प्रादुर्भावाबद्दल अधिकार्‍यांवर तोंडसुख घेतले. डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठमोठी कंत्राटे देऊन ठेकेदार नेमले आहेत. मात्र डेंग्यू प्रकोपाचे खापर मनपाकडून नागरिकांवर फोडले जात आहे. निर्दोष नागरिकांवर अकारण दंडात्मक कारवाई केली आहे. लोकप्रतिनिधींनी ती बाब नजरेस आणून दिली. जिल्हा परिषद स्थायी सभेत निधी नियोजनाचा प्रश्न गाजला. निधी मिळूनही त्याचे नियोजन न झाल्याने विकासकामे खोळंबली म्हणून सदस्यांनी सभा डोक्यावर घेतली.

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत हेच चित्र उमटले. कुपोषणमुक्तीसाठी नाशिक जिल्हा परिषदेने केलेल्या प्रयत्नांची दखल पंतप्रधान घेणार आहेत. येत्या मंगळवारी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांशी ते व्हिडीओ चित्रसंवाद साधणार आहेत. जिल्ह्याने या गोष्टीचा खरेच अभिमान मानावा का? कारण कालच राज्यातील बालकुपोषणाचे विरोधाभासी चित्र स्पष्ट करणारा बालविकास विभागाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. जूनमध्ये राज्यात सुमारे तेराशे बालमृत्यू झाल्याचे त्यात नमूद आहे. कुपोषणमुक्तीचा लढा लढणार्‍या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांशी पंतप्रधान संवाद साधणार त्याचवेळी हा अहवाल का प्रसिद्ध व्हावा?

वेळेचे हे भान निर्हेतूक मानावे का? परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव प्रशासनाला बिलकूल नसावी का? पंतप्रधान दिवसाकाठी वीस-वीस तास काम करतात. तरीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत शासन-प्रशासनात समन्वय का नसावा? सगळ्या पातळ्यांवर त्याचा अभाव का जाणवावा? बहुतेक समन्वयाअभावीच सरकारी घोषणा केवळ प्रसिद्धीसाठी आहेत, असे चित्र सध्या जनतेला दिसते. ही परिस्थिती चिंताजनकच आहे. राज्यातील एखाद्या जिल्ह्याच्या कार्याची पंतप्रधान आवर्जून दखल घेणार असतानाच त्यावर बोळा फिरवणारा अहवाल जाहीर व्हावा; यामागचे नेमके रहस्य काय असेल?

LEAVE A REPLY

*