शासकीय रुग्णालयांचा कामटाळूपणा?

0
‘अनेक शासकीय रुग्णालये एचआयव्हीग्रस्त रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायचे टाळतात. त्यांना थेट जे. जे. रुग्णालयात पाठवतात. त्यामुळे ‘जेजे’त अशा रुग्णांची गर्दी वाढत आहे. त्याचा रुग्णालयावर ताण वाढला आहे. अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी सहा-सहा महिने थांबावे लागणार आहे.

वर्षभरात ‘जेजे’त साडेपाचशेहून जास्त एचआयव्हीग्रस्तांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावी लागली. या प्रकरणी चौकशी व्हावी व अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक शासकीय रुग्णालयांना बंधनकारक करावे, अशी विनंती शासनाला करणार आहे’ असे महाराष्ट्राचे आरोग्य सहसंचालक व ‘जेजे’चे माजी प्रमुख पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी नुकतेच सांगितले. रुग्णालये जबाबदारी टाळतात की तेथील डॉक्टर?

डॉक्टर जबाबदारी टाळत असतील तर सरकारी आरोग्यसेवाच ‘रुग्ण’ बनली तर नवल काय? डॉ. लहाने विख्यात नेत्रविकारतज्ञ आहेत. गोरगरीब त्यांना ‘दृष्टिदाता’ मानतात. दुर्गम भागातील लाखो गरीब रुग्णांवर त्यांनी मोफत शस्त्रक्रिया केल्या. त्यांच्या कार्यकाळात लेसिक लेसरद्वारे चष्म्याचा नंबर कमी करण्याचा उपचार ‘जेजे’त सुरू झाला. अशा तज्ञ डॉक्टरांनाही आरोग्यसेवेतील सहकार्‍यांच्या कामचुकारपणाबद्दल तक्रार करावी लागावी?

शासनाने अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी असाच हा गैरप्रकार आहे. काही काळापूर्वी एचआयव्ही-एड्स हा भयंकर रोग मानला जायचा; पण परिस्थिती आता तशी राहिलेली नाही. शासन व अनेक सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांमुळे ही असाध्य व्याधी बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे. केवळ हस्तांदोलन वा व्याधीग्रस्ताजवळ बसण्याने किंवा सोबत जेवल्याने या रोगाचा संसर्ग होत नाही ही समज आता लोकांनाही आली आहे.

अशा रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना काय दक्षता घ्यावी याचे ज्ञान बहुतेक वैद्यकीय अधिकार्‍यांनाही असते. तरीही पालिका रुग्णालयाचे डॉक्टर एचआयव्हीग्रस्त रुग्णांवर शस्त्रक्रिया का करीत नाहीत? गरजूंवर उपचार करण्यास नकार देण्याचा अधिकार शासकीय रुग्णालयांना आहे का? तसा अधिकार नसेल तर शासन काय कारवाई करते? पालिका रुग्णालये व शासकीय वैद्यकीय अधिकार्‍यांची जबाबदारी शासनाने नमूद केलेली असेलच ना? महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील डॉक्टरांनी अधिकाधिक शस्त्रक्रिया कराव्यात म्हणून त्यांना तीस टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

तरीही पालिका रुग्णालये व त्यातील डॉक्टरांनी जबाबदारी का टाळावी? अनेक देशांत भारतीय डॉक्टर उत्कृष्ट सेवा देतात. मात्र देशांतर्गत वैद्यकीय व्यवसायाबद्दल असे प्रतिकूल चित्र का निर्माण व्हावे? शासनाने या बाबींचा आढावा घेऊन आरोग्यसेवेचा दर्जा सुधारेल व कामाची अळमटळम टळेल यासाठी उपाय योजण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

*