शारीरिक चाचणीत दीड हजार उमेदवार पात्र ; पोलीस भरती प्रक्रिया सुरू

0

नाशिक : जिल्ह्यातील रिक्त पोलीस शिपाई पदासाठी आजपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. नाशिक शहर पोलीस व ग्रामीण पोलीस दलातील 169 जागांसाठी आज पहिल्या दिवशी बोलवण्यात आलेल्या 2 हजार 169 उमेदवारांपैकी 1361 उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीत पात्र ठरले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.

आज सुरू झालेल्या भरती प्रक्रियेसाठी शहरात 969 जणांना बोलवण्यात आले यापैकी 697 उमेदवार हजर राहिले. 272 उमेदवार गैरहजर राहिले. यातील 643 शारीरिक क्षमतेत पात्र तर 54 उमेदवार अपात्र ठरले. प्रत्येक दिवशी किमान 1 हजार उमेदवारांचे टप्पे करण्यात आले आहेत. प्रथम धावणे यानंतर मैदानी व शारीरिक क्षमता चाचण्या या टप्प्यांनुसार प्रक्रिया होत आहे.

आज पहाटे 5 वाजेपासून मैदानी चाचणीला प्रारंभ नावनोंदणी, उमेदवार क्रमांक, उंची आणि छातीची मोजणी आज करण्यात आली. यातून मैदानी चाचणीसाठी उमेदवारांची निवड करण्यात येत आहे. यामध्ये शहीद चित्ते पुलापासून ते हॉटेल मिर्चीपर्यंत धावण्याची चाचणीही घेतली जाणार आहे. त्यासाठी सदरचा मार्ग पहाटे 5 ते 10 व सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत सामान्य वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती श्रीकांत धिवरे यांनी दिली.

ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनेही 72 जागांसाठी होत असलेल्या भरती प्रक्रियेस आजपासून प्रारंभ झाला. आज 1 हजार 200 उमेदवारांना चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. पैकी 827 उमेदवार हजर होते. 373 जणांनी दांडी मारली. तर 102 अपात्र ठरले. 7 जणांनी माघार घेतली. यामुळे 718 उमेदवार यामध्ये पात्र ठरले. येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज सकाळपासून मैदानी चाचणीला प्रारंभ करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली.

नाशिक शहर पोलिसांतील शिपाई पदाच्या 79 आणि बॅण्ड पथकातील 18 जागांसाठी 14 हजार 220 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई पदाच्या 72 जागांसाठी 11 हजार उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. असे एकूण साडेसत्तावीस हजार अर्ज आले आहेत.

LEAVE A REPLY

*